close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोदींची 'मन की बात' कळणारा मित्र हरपला

मोदींना दिल्लीत मिळालेला हा जिगरी दोस्त

Updated: Aug 25, 2019, 01:20 PM IST
मोदींची 'मन की बात' कळणारा मित्र हरपला

मुंबई : भाजपा नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं २४ ऑगस्ट शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. जेटलींच्या जाण्याने  भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींनी 'एक बहुमूल्य मित्र गमावल्याची' भावना व्यक्त केली आहे. 

मोदी आणि जेटलींची दोस्ती दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमधून सुरू झालेली नव्हे किंवा मोदी पंतप्रधान झाले म्हणून नवा मित्र मोदींना चिकटला नव्हता. तर कित्येक दशकं जुनी ही मैत्री. १९९४ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीत आले होते. मोदींची तेव्हा दिल्लीशी फारशी ओळख नव्हती. 

अरुण जेटली मात्र दिल्लीतल्या गल्लीगल्लीमधल्या राजकारणालाही पुरतं ओळखून होते. त्यामुळे १९९० च्या दशकात मोदींना दिल्लीत मिळालेला हा जिगरी दोस्त. २०१४ मध्ये भाजपानं नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यासाठी आलेल्या सगळ्या अडचणी निस्तरण्यात अरुण जेटलींची महत्त्वाची भूमिका होती.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरुण जेटली आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या लग्नात कुटुंबीयांची ओळख मोदींनीच करुन दिली होती. अरुण जेटलींचं लग्न संगीता डोगरांशी झालं. काश्मीरमधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीधारीलाल डोगरा यांची मुलगी संगीता. गिरीधारीलाल डोगरा आणि अरुण जेटली यांचा एकमेकांशी परिचय मोदींनीच करुन दिला होता. 

२०१४ मध्ये अरुण जेटलींचा अमृतसरमधून पराभव झाला. त्यानंतरही मोदींनी अरुण जेटलींना मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यांना अर्थ आणि संरक्षणसारखी महत्त्वाची खातीही दिली. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे अरुण जेटली निवडणूक लढले नाहीत. 

शंकर सिंह वाघेलांच्या बंडानंतर नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं. तेव्हापासूनच मोदी आणि जेटलींची दोस्ती पक्की झाली. यारों के यार, मित्रांच्या कायम पाठीशी राहणारे, विशेषतः मित्रांना गरज असेल तेव्हा त्याला साथ द्यायलाच हवी, हा धर्म मानणारे जेटली होते. दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये अरुण जेटलींच्या दोस्तीची नेहमी चर्चा असायची.

अरुण जेटलींच्या निधनानं भाजपामध्ये अरुणास्त झाला. भाजपानं एक बुद्धिमान नेता, फर्डा वक्ता, अभ्यासू प्रवक्ता गमावलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सच्चा दोस्त गमावलाय.