close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तुम्ही परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी येऊ नका; जेटलींच्या कुटुंबीयांची मोदींना विनंती

जेटलींच्या निधनामुळे पंतप्रधान मोदी तीन देशांचा परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी फिरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. 

Updated: Aug 25, 2019, 09:07 AM IST
तुम्ही परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी येऊ नका; जेटलींच्या कुटुंबीयांची मोदींना विनंती

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची देशाविषयी असलेली तळमळ आणि निष्ठेचे दर्शन घडले. अरूण जेटली यांनी शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ही दु:खद बातमी समजल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. 

नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिनच्या दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्समध्ये होणारी जी-७ परिषद आटपून ते सोमवारी भारतात परतणार होते. मात्र, जेटलींच्या निधनामुळे पंतप्रधान मोदी तीन देशांचा परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी फिरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. 

नरेंद्र मोदी अबुधाबीत असताना त्यांना जेटलींच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्यांनी जेटलींची पत्नी संगीता जेटली व मुलगा रोहन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मोदींनी या दोघांचे सांत्वन केले. 

त्यावेळी संगीता आणि रोहन जेटली यांनी, तुम्ही परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी येऊ नका, अशी विनंती मोदींना केली. तुम्ही देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेला आहात. शक्य असल्यास तुम्ही दौरा रद्द करु नका. देश हा सर्वात आधी येतो. त्यामुळे तुम्ही तुमचा दौरा पूर्ण करुनच परत या, असे जेटलींचा मुलगा रोहन याने मोदींना सांगितले. 

यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात कोणाताही बदल होणार नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी मोदींनी ट्विटवरून अरूण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच बहारिनमध्ये भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणातही त्यांनी अरूण जेटलींविषयी भावूक उद्गार काढले. मी आज इतक्या दूर असताना माझा मित्र कायमचा निघून गेला. काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज आपल्यातून निघून गेल्या. माझ्यासाठी ही खूपच द्विधा परिस्थिती आहे. एकीकडे कर्तव्य आहे आणि दुसरीकडे अनेक वर्षांपासून असलेले मैत्रीचे नाते आहे, असे मोदींनी म्हटले होते.