अडचणीच्या काळात भाजप नेहमी जेटलींवर विसंबून असायचा- अडवाणी

राजकीय वर्तुळात वावरतानाही जेटलींनी अनेकांशी असलेली मैत्री कायम जपली.

Updated: Aug 25, 2019, 08:15 AM IST
अडचणीच्या काळात भाजप नेहमी जेटलींवर विसंबून असायचा- अडवाणी title=

नवी दिल्ली: भाजप पक्ष अडचणीच्या काळात नेहमी अरूण जेटली यांच्यावर विसंबून असायचा, अशी आठवण पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितली. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे आणि संघ परिवाराचे नव्हे तर देशाचे नुकसान झाल्याचे अडवाणी यांनी म्हटले. 

अरूण जेटली यांच्याकडे कुशाग्र आणि चिकित्सक बुद्धी होती. त्यामुळे एखाद्या क्लिष्ट समस्येचे उत्तर शोधण्यासाठी पक्ष नेहमी त्यांच्यावर विसंबून असायचा. त्यांच्या जाण्याने मी खूप जवळचा सहकारी गमावला आहे. अरूण जेटली हे कायद्याचे उत्तम जाणकार, उत्कृष्ट संसदपटू आणि चांगले प्रशासक होते, असे अडवाणी यांनी सांगितले. 

तसेच राजकीय वर्तुळात वावरतानाही जेटलींनी अनेकांशी असलेली मैत्री कायम जपली. त्यांचा स्वभाव मृदू आणि उत्साही होता. उत्तम खवय्ये असलेले जेटली मला नेहमी चांगल्या  रेस्टॉरंट्सची माहिती देत. दिवाळीत ते सहकुटुंब आमच्या घरी येत असत, असा आठवणी अडवाणी यांनी सांगितल्या. 

अरूण जेटली यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर आज सकाळी दहा वाजता जेटलींचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणले जाईल. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर निगम बोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. दुपारी साधारण दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.