गहलोत सोशल मीडियावर ट्रोल, पण VIRAL VIDEO मागचं सत्य वेगळंच

व्हिडिओत ते 'पाण्यातून वीज काढून घेतल्यानंतर पाण्याची ताकद संपल्याचं' वक्तव्य करत आहेत 

Updated: Jun 6, 2018, 10:44 AM IST
गहलोत सोशल मीडियावर ट्रोल, पण VIRAL VIDEO मागचं सत्य वेगळंच  title=

जयपूर : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय संघटनेचे महासचिव अशोक गहलोत यांना त्यांच्या एका वक्तव्यासाठी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. ट्विटरवर त्यांचा एक व्हिडिओ वायरल झालाय... यामध्ये ते 'पाण्यातून वीज काढून घेतल्यानंतर पाण्याची ताकद संपल्याचं' वक्तव्य करत आहेत. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांनी चांगलंच उचलून धरलंय... त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होतेय. 

दुसरीकडे मात्र, गहलोत यांचा केवळ एका वाक्याचा व्हिडिओ वायरल होत असल्याचं सत्य समोर येतंय. गहलोत यांचं वायरल होत असलेलं वाक्य भारतीय जनसंघाच्या लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत होतं, असा दावा ते करत होते... असं त्यांचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतंय. 

गहलोत यांच्यावर टीका होत असल्याचं लक्षात येताच त्यांचं समर्थकही सक्रीय झालेत... आणि त्यांनी गहलोत यांचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केलाय. गहलोत यांनीही आपल्यावर होत असलेल्या टीकेची फिरकी घेत आपल्याला लोकांनी #scientistgehlot उपाधी दिल्याबद्दल टीकाकारांचे आभार मानलेत. 

'जेव्हा नेहरुंनी वाघा डॅम बनवला होता. तेव्हा संघवाले म्हणत होते, की नेहरुंचं डोकं खराब झालंय... पाण्यातून वीज निर्माण होई आणि हे पाणी शेतात जाईल... पाण्यातून ताकदच निघून गेली तर हे पाणी शेताच्या कामी कसं येईल', असं या संपूर्ण व्हिडिओमध्ये गहलोत म्हणताना दिसतात.