मुंबई : जुलै महिन्यामध्ये जवळपास संपूर्ण देशात पावसाने चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय काही भागांमध्ये वरुणराजाच्या बरसण्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. बिहार आणि आसाममध्ये पूर परिस्थितीमुळे मृतांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. त्यामुळे हा पाऊस आता अनेक कुटुंबासाठी अडचणीचा ठरत आहे. आतापर्यंत अतिवृष्टीने बिहारमध्ये ३४ आणि आसाममध्ये १५ जाणांचा बळी घेतला आहे.
फोटो: रॉयटर्स
आसाममध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला पूर पाहता अनेक भागांवर याचा थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जवळपास ७० टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वन्य प्राणीही या पूरामुळे प्रभावित झाले आहेत. त्रिपुरा येथेही पूरग्रस्तांसाठी काही शाळांमध्ये शिबीरं उभारण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पूरग्रस्तांना आसरा दिला जात आहे.
Due to floods in #Assam, 70% of Kaziranga National Park is submerged; the forest department is alert on National Highway 37 in order to avoid any poaching chances by hunters. pic.twitter.com/4PcKUNNdXu
— ANI (@ANI) July 15, 2019
बिहारमध्ये अररिया, किशनगंज, सुपौल, दरभंगा, शिवहर, सीतामढी, पूर्व चंपारण, मधुबनी, मुजफ्फरपूर, पूर्णिया आणि सहरसा या भागांमध्ये पूराचं थैमान पाहायला मिळत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास २५ लाखांहून अधिक नागरिक या पूरामुळे प्रभावित झाले आहेत. परिणामी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला जात असून, येत्या काळातील परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्कताही पाळण्यात येत आहे.