ATM ने पैसे काढणं नवीन वर्षात महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पुढील महिन्यापासून म्हणजेच नवीन वर्षापासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे.

Updated: Dec 2, 2021, 04:05 PM IST
ATM ने पैसे काढणं नवीन वर्षात महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : पुढील महिन्यापासून म्हणजेच नवीन वर्षापासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. जूनमध्येच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 1 जानेवारी 2022 पासून विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्याची परवानगी दिली. अॅक्सिस बँकेने सांगितले की, “RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 01-01-22 पासून अॅक्सिस बँक किंवा इतर बँक एटीएममधील विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार शुल्क + GST असे आकारु शकते.

नवीन एटीएम व्यवहार शुल्क

पुढील महिन्यापासून म्हणजेच जानेवारी 2022 पासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास त्यांना प्रति व्यवहार ₹20 ऐवजी ₹21 द्यावे लागतील. RBI ने म्हटले होते की, "बँकांना जास्त इंटरचेंज चार्जेसची भरपाई आणि किमतीत सामान्य वाढ पाहता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल."

मोफत एटीएम रोख काढण्याची मर्यादा

ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहारांसाठी (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह) पात्र राहतील. ते मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो केंद्रांवर पाच विनामूल्य व्यवहार करू शकतील.

याशिवाय, मध्यवर्ती बँकेने बँकांना सर्व केंद्रांवर आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहाराचे इंटरचेंज शुल्क 15 वरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 ते 6 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली. हे 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहे.