Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूर ते मुंबई असा 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. सध्या ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) असून इथे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय. राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याचं काँग्रेसने म्हटलंय. या हल्ल्यात राहुल गांधी यांच्या कारची काच फुटल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगालमधल्या मालदामध्ये (Malada) ही घटना घडली. या घटनेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधी यांच्या सुरक्षेत जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्या कारवर कोणी दगडपेक केली याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. काही लोकांना संशयीत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यातील अंतर आणखी वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसने हल्ल्याच्या घटनेसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरलं आहे.
ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसला धक्का
लोकसभा निवडणूक 2024 च्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये दाखल झालीय. ज्या मालदामध्ये राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला झाला. त्याच मालदात ममता बॅनर्जी यांची सभा होती. या सभेतून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधी यांचा एकही आमदार नाही. आणि लोकसभेसाठी आम्ही यांना दोन जागा देत होतो. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल याचा ममता बॅनर्जी यांनी पुनरुच्चार केला आहे.
तृणमूल काँग्रेस भाजपाचा एकट्यानेच पराभव करुन शकते. काँग्रेसने पश्चिम बंगालमधल्या काय केलं असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस दोन जागांवर समाधानी नाही, पण काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. यावरुन ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली असून ही यात्रा मालदा आणि मुर्शिदाबादमधून यात्रा करणार आहे. या दोन जागांवर 2019 मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, पश्चिम बंगाल काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक सभा घेण्यास ममता सरकारने परवानगी दिली नसल्याचा आरोप केला आहे.