अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Updated: Jan 19, 2024, 08:10 PM IST
अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य title=

सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

नेमका दावा काय? 

खादी ऑर्गेनिक असे नाव असलेल्या एका कंपनीने राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तेथील प्रसाद तुमच्या घरी आणून दिला जाईल, असा दावा केला आहे. अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो. यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकींग करावे लागेल. यात मोफत प्रसाद असे दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला घरचा पत्ता टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रसादासाठी डिलिव्हरी चार्जेस भरावे लागतील. पण जर हे चार्जेस तुम्हाला द्यायचे नसतील, तर तुम्हाला शहरातील मोफत वितरण केंद्रात हा प्रसाद दिला जाईल.   

खादी ऑर्गेनिक ही कंपनी मंदिरातील प्रसादाचे कोणतेही शुल्क आकारणार नाही. पण तुम्हाला डिलिव्हरीसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी ५१ रुपये डिलिव्हरी चार्जेससाठी मोजावे लागणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

मोफत प्रसादाचा दावा खरा की खोटा?

या दाव्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टला विचारणा करण्यात आली असता त्यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तेथील प्रसादाची ट्रस्टकडून ऑनलाइन विक्री केली जाणार नाही. तसेच या प्रसादाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी कोणत्याही विक्रेत्याला किंवा कंपनीला परवाना किंवा परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच खादी ऑरगॅनिक नावाच्या वेबसाईटशी कोणतेही ट्रस्ट किंवा कोणतीही शासकीय संस्थेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे भक्तांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कशी आहे रामलल्लाची मूर्ती

दरम्यान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना करण्यात आली आहे. त्याची पहिली झलकही समोर आली आहे. प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे. म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती काळ्या शाळिग्राम शिळेपासून बनवण्यात आली आहे. श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यातपूर्वी विधी आणि पूजा करण्यात आल्या. काशीहून आलेल्या विद्वानांनी कार्यक्रम संपन्न केला. 121 आचार्यांनी विधीप्रमाणे पूजा केली. 200 किलो वजनाच्या रामललाच्या मूर्तीचा जलाभिषेक करून गर्भगृहात स्थापना करण्यात आली.