Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : जवळपास 500 वर्षांच्या प्रदीर्ध प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला जेव्हा साक्षात प्रभू श्री राम त्यांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या अदभूत मंदिरात विराजमान झाले आणि त्यांच्या बालरुपातील मूर्तीला प्राणप्रतिष्ठापनेनंतर जागृत करण्यात आलं. यावेळी मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रमुख आचार्यांची उपस्थिती होती. तर, मंदिराबाहेर हजारो मान्यवर आणि ब्राह्मण, आचार्यांची हजेरी पाहायला मिळाली होती.
12 वाजून 20 मिनिटांनी साधल्या गेलेल्या अभिजीत मुहूर्तावेळी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि सर्वत्र शंखानादानं अयोध्यानगरी भारावून गेली. पौष शुक्ल कूर्म द्वादशी, विक्रम संवत 2080 मध्ये मृगशिरा नक्षत्रातील अभिजीत मुहूर्त हा अतिशय दुर्मिळ योग होता. यावेळी मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्तावाखाली सर्व विधी पार पडले.
काशीच्या लक्ष्मीकांत दीक्षित यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील विधींचं नेतृत्त्वं केलं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण प्रकांड विद्वान लक्ष्मीकांत दीक्षित यांचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडला जातो. हे नातं अतिशय खास आहे, कारण आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित हे महान पंडित गागा भट्ट यांचे वंशज आहेत. गागाभट्टांनीच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता.
Prime Minister Narendra Modi performs 'Dandavat Pranam' at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya.#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/7yqX4Z0qNf
— ANI (@ANI) January 22, 2024
प्राणप्रतिष्ठेच्या वेळी राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये फक्त पाच व्यक्तींची उपस्थिती होती, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित. या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त प्रख्यात ज्योतिषाचार्य आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक ज्ञाता गणेशवर शास्त्री द्रविड यांनी काढला होता.