#AyodhyaVerdict रामजन्मभूमी निकालानंतर नेतेमंडळींची पहिली प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंनीही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया... 

Updated: Nov 9, 2019, 12:33 PM IST
#AyodhyaVerdict रामजन्मभूमी निकालानंतर नेतेमंडळींची पहिली प्रतिक्रिया  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : राम जन्मभूमी, बाबरी मशीदप्रकरणी शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला. ही वादग्रस्त जमीन राम जन्मभूमीचीच असल्यातचं सांगत यावर हिंदूंचा हक्क असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आलं आहे. शिवाय मुस्लीम समुदायासाठी अयोध्या परिसरातच एक स्वतंत्र जमीन देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील एका घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला, ज्याअंतर्गत मुस्लीम समुदायाला पाच एकर जमीन देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. बहुप्रतिक्षित असा हा निर्णय समोर येतात राजकीय पटलावरही त्याच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. केंद्रीय मंत्र्यांपासून देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या दिग्गजांनी या प्रकरणी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हणत जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. तर, निर्मोही आखाड्याचे प्रवक्ते, कार्तिक चोप्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या नितीश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत करावं, अशी प्रतिक्रिया दिली. सामाजिक बांधिलकीसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सोबतच यापुढे आता कोणीही याविषयी कोणताही वाद सुरु करु नये असं आवाहन त्यांनी केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत शांतता राखण्याचं आवाहन केलं. भारतीय एकात्मता चिरायू होवो, असं म्हणत या निर्णयाचा आदर करुया अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. सध्याच्या घडीला मंत्रीमहोदय, राजकीय नेतेमंडळी अतिशय उत्सफूर्तपणे त्यांच्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे.