नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संत्ता संघर्षानंतर भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी फ्लोर टेस्ट आधीच राजीनामा दिला... या राजीनाम्यामुळे येडियुरप्पा यांनी आपलाच एक जुना रेकॉर्ड तोडलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको... कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारं ११२ आमदारांचं मत आपल्याकडे असणं अशक्य आहे, हे लक्षात आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा देणं योग्य वाटलं... येदियुरप्पा यांनी आपल्या भाषणात पुढच्या रणनीतीचा उल्लेख केला. त्यानंतर ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी निघून गेले. जनतेने आम्हाला ११३ जागा दिल्या असत्या तर चित्र काही वेगळं राहिलं असतं... राज्यात प्रामाणिक नेत्यांची गरज आहे. आज माझी अग्निपरीक्षा आहे... पण, मी पुन्हा जिंकून येईन... आम्ही १५० हून अधिक जागा निवडून आणू... राज्यातील प्रत्येक क्षेत्रात जाऊ आणि जिंकून येऊ... राज्यात लवकरच निवडणुका होतील, असं त्यांनी यावेळी म्हटलं.
बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या येडियुरप्पांनी आपलाच एक 'रेकॉर्ड' ब्रेक केलाय... यापूर्वी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर २००७ मध्ये मोडतोड करत-करत भाजपनं जेडीएससोबत हातमिळवणी केली... परंतु, येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर अवघ्या सात दिवसांच्या आतच जेडीएसनं आपलं समर्थन मागे घेतल्यानं येडियुरप्पांचं सरकार कोसळलं. आज पुन्हा एकदा येडियुरप्पांनी बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा दिला... मंत्रिमंडळाशिवाय येडियुरप्पा ५५ तासांसाठी मुख्यमंत्री पदावर बसले होते... यावेळी ते सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले... आणि आपला जुना रेकॉर्ड ब्रेक केला.