नवी दिल्ली: शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवकालीन इतिहासाचे संशोधन आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेचले. शिवकालीन इतिहासावर त्यांनी लिहलेली पुस्तके चांगलीच गाजली होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेले 'जाणता राजा' हे नाटकदेखील रंगभूमीवर तुफान लोकप्रिय झाले होते. त्यांच्या याच कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यापूर्वी राज्य सरकारने २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता. पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, पद्मविभूषण जाहीर झाल्याचे कळताच खूप आनंद झाला. मानाचा किताब जाहीर होईल, याची कल्पना नव्हती. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांचा हा गौरव आहे. त्यांच्याबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम आहे, असे पुरंदरे यांनी म्हटले. याशिवाय, महाराष्ट्राच्या डॉ. अशोक कुकडे यांनाही 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. अशोक कुकडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत. विवेकानंद प्रतिष्ठान आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते वृद्धांची सेवा करत आहेत.
Folk artist Teejan Bai, Djibouti's President Ismail Omar Guelleh, L&T chairman Anilkumar Manibhai Naik, and writer Balwant Moreshwar Purandare to be conferred with Padma Vibhushan by the President. pic.twitter.com/hkxAD2O3DJ
— ANI (@ANI) January 25, 2019
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते कादर खान यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अभिनेता मनोज वाजपेयी, फुटबॉलपटू सुनील छेत्री, नृत्यदिग्दर्शक प्रभूदेवा, क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक शंकर महादेवन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनाही पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. पद्म पुरस्कारांमध्ये ४ पद्मविभूषण, १४ पद्मभूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि भुपेन हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी - तीजन बाई, इस्माईल ओमर, अनिल कुमार नाईक, बाबासाहेब पुरंदरे
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी - डॉ. अशोक कुकडे, एस. नंबी नारायण, बच्छेंद्री पाल, कुलदीप नायर
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी - मनोज वाजपेयी, सुनील छेत्री, गौतम गंभीर, सुदाम काटे, वामन केंद्रे, कादर खान, रवींद्र कोल्हे- स्मिता कोल्हे