बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज निकाल; आरोपी अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची नावे

बहुप्रतिक्षित बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज लखनऊतील विशेष न्यायालय निकाल देणार आहे.  

Updated: Sep 30, 2020, 07:06 AM IST
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज निकाल; आरोपी अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांची नावे  title=

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज लखनऊतील विशेष न्यायालय निकाल देणार आहे. १९९२ मध्ये अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं आहेत. 

सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व ३२ आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग, विनय कटियार, साध्वी ऋतंबरा यांचा समावेश आहे. 

उमा भारती आणि कल्याण सिंग कोरोनातून बरे झाल्यावर आता विश्रांती घेत आहेत. त्यामुळे ते आज न्यायालयात उपस्थित राहणार का याची उत्सुकता आहे. कल्याण सिंह यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बाबरी मशिद पाडली गेली होती. राजस्थानच्या राज्यपालपदाचा त्यांचा कार्यकाल गेल्यावर्षी संपल्यावर त्यांचाही खटल्यात समावेश करण्यात आला.

तर राममंदिर निर्मितीसाठी स्थापन झालेल्या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. या खटल्याचा निकाल देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ३१ ऑगस्टची डेडलाईन दिली होती. ती नंतर एक महिन्याने वाढवण्यात आली होती. हे काम वेळेत व्हावं यासाठी विशेष न्यायालयाने रोज सुनावणी घेतली होती. 

6\