Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Dham Dhirendra Shastri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. 26 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा आहे. आपल्या कथित दैवीशक्तीने लोकांच्या अडचणी दूर करणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशासाठीही असं काही करु शकतात का? एका मुलाखतीत विचारणा करण्यात आली असता त्यांनी या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे.
तुम्ही कधी देशाच्या भल्यासाठी काही काम केलं आहे का? अशी विचारणा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना करण्यात आली. म्हणजे तुम्ही करोना महामारी (Covid 19) येणार आहे, दहशतवादी हल्ला कधी होणार? हे कधी सांगितलं आहे का? असे प्रश्न विचारण्यात आले.
त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, "मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही किंवा ज्योतिषी नाही. पण जेव्हा कोणीही माझ्या दरबारात येतं तेव्हा माझ्यातील प्रेरणा आणि भावनांच्या आधारे त्यांची समस्या आणि उपाय याबद्दल सांगतो. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एखादा नेता मला भेटायला येतो तेव्हा राज्याची स्थिती काय असेल अशी विचारणा करतात. तेव्ही मी त्यावर योग्य उपाय सांगतो".
पुढे ते म्हणाले की "जेव्हा कोणी अर्जच केला नसेल आणि मीच कोणत्या समस्या निर्माण होतील असं सांगू लागलो तर माझे उपाय कोण ऐकणार? कोण नियम ऐकणार आणि त्यांचं पालन करणार? असंही जगाच्या कल्याणासाठी मी रोज प्रार्थना करत असतो".
जेव्हा त्यांना शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी तुमच्या दरबारमध्ये कोणी अर्ज केला होता? अशी विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, कोणीही अर्ज केला नव्हता. कोणीतरी आपल्या पठाण चित्रपटात भगव्या रंगाला बेशरम म्हटलं आहे असं सांगितलं म्हणूनच आपण विरोध करण्याचं आवाहन केलं होतं.
नागपूरमधील रामकथा कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपस्थित होते. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जाहीर आव्हान दिलं. हा सगळा प्रकार त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले. यामुळे त्यांच्याकडे खरंच काही दैवीशक्ती आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हा सगळा प्रकार कट असल्याचा दावा केला असून रायपूरमध्ये 20321 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात अंनिसने हजर राहावं असं प्रतीआव्हान दिलं आहे. "याआधी मी सात दिवसांसाठी सभा भरवली होती, तेव्हा तुम्ही आला नाहीत. जर मला संधी मिळाली तर मी परत येईन. पण सध्या मी तुमचं आव्हान स्वीकारत आहे. तुम्ही 20-21 दरम्यान रायपूरमध्ये येऊ शकता. मी तिथे कार्यक्रम घेणार आहे. मी तुमच्या तिकीटाचेही पैसे देईन", असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले आहेत.
आपण १६० कुटुंबांची घरवापसी केली असल्याने हा वाद होणार याची आपल्याल कल्पना होती असा दावाही त्यांनी केला आहे. "या कुटुंबांनी धर्मवापसी आणि घरवापसी केली असून करोडो खर्च करत आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी जर ते करोडो खर्च करत असतील आणि त्यातील १० कोटी आम्हाला दिले तर त्यात चुकीचं काय?", अशी विचारणाही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केली आहे.
अशा वादाकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं सांगताना त्यांनी घराच्या मागे कुत्रे भुंकत असतात असं विधान केलं आहे. तसंच आपल्याला आव्हान देणाऱ्यांनी कोर्टात यावं असंही म्हटलं आहे.
बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम मंदिराशी जोडलेले आहेत. त्यांचे देशभरात हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. असं सांगितलं जातं की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा निर्मोही आखाडाशी जोडलेले होते.