भारतात बेकायदेशीरपणे कसं घुसायचं? बांगलादेशच्या YouTuber ने चक्क व्हिडीओ दाखवला, 'BSF झोपलंय का', नेटकरी संतापले

बांगलादेशमधील (Bangladesh) एका युट्यूबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने कोणतीही कागदपत्रं, व्हिसा आणि पासपोर्ट नसताना कशाप्रकारे भारतात प्रवेस करु शकता हे दाखवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 28, 2024, 12:33 PM IST
भारतात बेकायदेशीरपणे कसं घुसायचं? बांगलादेशच्या YouTuber ने चक्क व्हिडीओ दाखवला, 'BSF झोपलंय का', नेटकरी संतापले title=

भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा मुद्दा अनेकदा समोर आला आहे. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी ते निर्धास्तपणे कोणत्याही वैध कागदपत्रांविना राहत आहेत. हे बांगलादेशी नेमके भारतात कोणत्या मार्गाने घुसतात हा नेहमीच चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. यादरम्यान एका बांगलादेशी युट्यूबरने याच विषयावर तयार केलेला एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो चक्क भारतात बेकायदेशीरपणे कसं घुसायचं याची माहिती देत आहे. "DH Travelling Info" असं त्याच्या अकाऊंटचं नाव आहे. व्हिडीओत तो भारतात जाण्यासाठी कोणताही व्हिसा, पासपोर्ट किंवा कागदपत्रांची गरज नसल्याचं सांगत आहे. 

व्हिडिओमध्ये तरुण आपण सिल्हेट विभागात असलेल्या सुनमगंज जिल्ह्यात उभं असल्याचं सांगत आहे. हा भारतातील प्रवेश बिंदू आहे. त्यानंतर तो भारताकडे जाणारा रस्ता दाखवतो आणि हेदेखील सांगतो की, जे लोक या मार्गाने प्रवास करतील त्यांना बीएसएफसारखे अडथळे पार करावे लागतील. जर ते पकडले गेले तर त्यांना परिणामही भोगावे लागू शकतात. 

यानंतर जसजसा व्हिडीओ पुढे जातो त्यात तो भारतातील बीएसफचा कॅम्पही दाखवतो. तसंच काही टनेल दाखवतो ज्यामधून सहजपणे प्रवास केला जाऊ शकतो. यावेळी तो नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात जाऊन आपल्या देशाचं नाव बदनाम करु नका असा सल्लाही देतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jist (@jist.news)

हा व्हिडीओ तसा जुना आहे, मात्र नव्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्यापासून त्याला 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसंच 7 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी यावर कमेंट करताना सुरक्षेप्रती चिंता व्यक्त केली आहे. 

इंस्टाग्राम युजर अपराजिता देशपांडेने लिहिलं आहे की, "बीएसएफ झोपलं आहे का? जर एखाद्या यूट्यूबरला मार्ग माहित असेल तर सर्वांना माहित आहे. मग बीएसएफ सीमेवर काय करत आहे!?"

"हो, त्यांना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज नाही. एकदा त्यांनी बोगदा ओलांडला की, पॅन कार्ड आणि आधार कार्ड विकत घेतात. या, ते मिळा आणि मतदान करा," असं एका युजरने म्हटलं आहे.