पंजाबः बँक मॅनेजरचा राहत्या घरात मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर, मॅनेजरच्या शरीरावर लेडीज अंडर गारमेंट परिधान केले गेले होते. त्यामुळं या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. पोलिसांनी मॅनेजरचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर, तिथे जवळपास राहणाऱ्या लोकांकडून चौकशी केली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. मृत मॅनेजरच्या परिवारातील सदस्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
लुधियानातील अमर नगर परिसरात ही घटना घडली आहे. लुधियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हा सीनिअर बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होता. विनोद मसीहा असं त्याचं नाव असून गेल्या दीड वर्षांपासून तो भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. आज सकाळी तो घरातून बाहेर आला नाही म्हणून घर मालकाने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून घर मालकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तेव्हा त्याने परिसरातील नगरसेवकांना व अन्य लोकांना याबाबत माहिती दिली.
घर मालकाने पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पोलीस निरीक्षक अमृतपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा मॅनेजरचा मृतदेह छताला लटकत होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे, मॅनेजरचे हात मागे बांधले होते तर त्याच्या शरीरावर महिलांचे अंतरवस्त्र होते.
या प्रकरणी घातपाताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसंच, फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं. तीन दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस होता. तसंच, त्याने आत्महत्या केली की कोणी त्याची हत्या केली, याचा गुंता वाढला आहे.
विनोद मसीहा कॅनेरा बँकेत कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी व मुलगी दुसरीकडे राहत होते. तसंच, शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी कधीच त्याच्या कुटुंबीयांना इथे आलेले पाहिलं नाही. तर, त्याच्या खोलीतूनही सुसाइड नोट सापडली नसल्याने नेमकं काय घडलं हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद त्यांच्या एका नातेवाईकांकडे रोज जेवायला जात होता.
शेजाऱ्यांनी शुक्रवारी रात्री शेवटचे विनोद मसीह यांना पाहिलं होतं. बँकेतून ड्युटी संपवून ते घरी परतत होते. खोलीत जाताच त्यांनी दरवाजा बंद केला, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी विनोद मसीहा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच, परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.