नवी दिल्ली : तुमची बँकेशी निगडीत काही कामं बाकी असतील तर ती आजच पूर्ण करून घ्या... कारण ती बाकी राहिली तर तुमची पुढच्या कामांत अडथळा निर्माण होऊ शकतो. पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा इतर बँकिंग सेवेशी निगडीत काही कामं बाकी असतील तर ती आजच पूर्ण करावी लागणार आहेत.
शुक्रवारी आणि शनिवारी अर्थात ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुले बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहेत. तर त्याच्या पुढच्या दिवशी अर्थात २ फेब्रुवारी रोजी रविवार - सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशीही बँका बंद राहतील.
बँक कर्मचाऱ्यांचा संप आणि जोडून आलेला रविवार यामुळे बँकांच्या एटीएम मशीनमध्येही पैशांची खळखळाट दिसू शकतो.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भारतीय स्टेट बँकेसहीत (SBI) इतरही सार्वजनिक बँकांनी आपल्या ग्राहकांना अलर्ट दिलाय. दरम्यान, खासगी बँकांवर मात्र या संपाचा परिणाम होणार नाही. या दरम्यान ऑनलाईन बँकिंग सेवा मात्र सुरळीत सुरू असतील.
बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेची मुख्य मागणी पगारात वाढीची आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा मुद्दा नोव्हेंबर २०१७ पासून लांबणीवर पडलाय. याशिवाय कामाच्या वेळा निश्चित करणे, कौटुंबिक पेन्शन इत्यादी मागण्याही असल्याचं 'ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन'चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी म्हटलंय.