'बीबीसी जगातील सर्वात...', आयकर कारवाईदरम्यान भाजपा प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य

दिल्ली आणि मुंबईतसहित बीबीसीच्या 20 ठिकाणी आयटीने छापा टाकले आहेत, देशात अघोषित आणीबाणी असल्याची काँग्रेसची टीका

Updated: Feb 14, 2023, 03:27 PM IST
 'बीबीसी जगातील सर्वात...', आयकर कारवाईदरम्यान भाजपा प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य title=

BBC IT RAID : बीबीसीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयासह (BBC Head Office) मुंबईतल्या कार्यालयावर आयकर विभागाने (IT Raid) छापा टाकला आहे. कारवाईदरम्यान बीबीसी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना फोन न वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  लंडनमधील बीबीसीच्या जागतिक मुख्यालयाला छापेमारीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. दिल्लीतील बीबीसीचं ऑफिस सील करण्यात आल्याचीही माहिती आहे. 

भाजपची पहिली प्रतिक्रिया
बीबीसीवर आयकर विभागाची कारवाई सुरु असताना भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. BBC ही देशातली सर्वात बकवास आणि भ्रष्ट महामंडळ असल्याचं भाजपा प्रवक्ता गौरव भाटियाना (Gaurav Bhatia) यांनी म्हटलंय. बीबीसीची कृत्य पाहिलं तर हे सिद्ध होतं, असं गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. बीबीसीवर कारवाई सुरु असताना विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण भारत संविधान आणि कायद्यानुसार चालणारा देश आहे, असंही गौरव भाटिया यांनी म्हटलंय.

बीबीसीवर आयकर विभागाने केलेली कारवाई नियमानुसार आणि संविधानातंर्गत आहे, प्रत्येक एजन्सी कोणत्याही दबावाशिवाय आपापलं काम करत आहे. भारतात काम करणारी कोणतीही कंपनी असो किंवा मीडिया असो प्रत्येकाला भारतीय कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करावं लागेल. कंपनी नियमानुसार काम करत असले तर त्यांना भीती कशाची असंही गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाला आपलं काम करु द्यावं, काय खरं काय खोटं हे सिद्ध होईल असं गौरव भाटिया यांनी म्हटलंय.

'बीबीसीचा इतिहास कलंकित करणारा'
बीबीसीची काम करण्याची पद्धत आणि काँग्रेसचा एजेंडा एकसारखाच आहे. बीबीसीचा इतिहास भारताला कलंकित करणारा आहे. इंदिरा गांधी यांनी भारतात BBC वर बंदी आणली होती. BBC ने आपल्या एका रिपोर्टमध्ये काश्मिर दहशतवाद्यांना काश्मिरमधील युवा म्हटलं होतं. बीबीसीने होळी सणावरही टीका केली होती. तर महात्मा गांधी यांच्यावरही टिपण्णी केली होती. 

बीबीसीच्या कार्यालयावर छापे
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांवर मंगळवार सकाळपासून आयकर विभागाचे छापे सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय करातील अनियमिततेमुळे बीबीसी कार्यालयात आयटीची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना कार्यालयातून घरी जाण्यास सांगण्यात आलं आहे.

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीशी संबंध
बीबीसीच्या कार्यालयावरील आयकर विभागाच्या कारवाईवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी याचा गुजरात डॉक्युमेंट्रीशी (BBC Gujrat Documentry) संबंध जोडला आहे. बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि 2002 च्या गुजरात दंगल या विषयावर आधारित डॉक्युमेंट्री प्रकाशित केली होती. त्यावरुन बराच वाद झाला होता. केंद्र सरकारने ही डॉक्युमेंट्री म्हणजे अजेंडा असल्याचं सांगत त्यावर बंदी घातली होती. फेसबुक, ट्विटरलाही या बीसीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.