कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप (BJP) अध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी राज्यातील पुढचे सरकार भगवा पक्ष स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या बाजूने जोरदार लाट असल्याचा त्यांचा दावा आहे. दिलीप घोष म्हणाले की, भाजप जिंकल्यास केवळ नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री होणे आवश्यक नाही. मेदिनीपूरचे खासदार घोष यांनी असा दावा केला की विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पक्षाच्या बाजूने निर्माण झालेली तीव्र लाट कायम राहील. “पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर तृणमूल काँग्रेस व त्यांचे नेते हतबल आहेत. निवडणूक जसजशी पुढे जाईल तसतसे भाजपच्या बाजूने वातावरण अधिक मजबूत होईल आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पराभव जाणवेल." (West Bengal Assembly elections 2021)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह लोकसभेचे तीन सदस्य आणि राज्यसभेचे एक सदस्य स्वपन दासगुप्ता यांना उमेदवारी दिली आहे, परंतु घोष यांचा समावेश नाही. पक्षाने विजय मिळविला तर घोष मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. भाजप निवडणुकीत विजयी झाल्यास नवनिर्वाचित आमदारांपैकी कोणीही मुख्यमंत्री असेल का असे विचारले असता ते म्हणाले की, “कोणताही निर्णय पक्षाकडून घेतला जाईल परंतु नवनिर्वाचित आमदारांपैकी मुख्यमंत्री झाला पाहिजे असं काही नाही." ममताजी मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्या आमदार नव्हत्या." (West Bengal Assembly election)
पहिल्या टप्प्यात 30 पैकी 26 जागा जिंकण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दाव्याचा उल्लेख करताना घोष म्हणाले की, 'राज्यातील जनता यापुढे स्वतंत्रपणे मतदान करण्यास घाबरत नाही.' ते म्हणाले की, भाजपच्या बाजूने जोरदार लाट आहे आणि ते निवडणुकीच्या निकालावर दिसेल. प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणाले की, कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत होती. पण पक्षाने येथे बरीच कामे केली आणि त्याचा परिणाम आता निवडणुकांमध्ये दिसून येईल. अलीकडेच घोष यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायाची दुखापत दाखवण्यासाठी साडीऐवजी बर्म्युडा (हाफ पँट) घालावे.'
भाजपा कार्यकर्त्यांकडून जय श्री रामच्या घोषणेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, "ही बंगालच्या जनतेची घोषणा आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या अत्याचाराविरोधात संतापाची भावना आहे." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून सार्वजनिक जीवनाची त्यांनी सुरुवात केली. 2014 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले आणि राज्यात भाजपचे सरचिटणीस झाले. नंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले.
त्यांनी आपल्या राजकीय डावाची सुरुवात 2016 च्या विधानसभा निवडणुकीपासून केली. पश्चिम मेदिनीपुरीतील खडगपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आणि येथून सात वेळा आमदार असलेल्या काँग्रेसचे ज्ञानसिंग सोहनपाल यांचा त्यांनी पराभव केला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक सभेत भाषण करताना घोष यांचं जोरदार कौतुक केलं होतं.
पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. (West Bengal elections 2021)