योगी सरकारचा मोठा निर्णय; भीम आर्मीचा प्रमुख रावणची सुटका

सहारनपूर दंगलीच्यावेळी जातीय तेढ पसरवल्याचा आरोप

Updated: Sep 13, 2018, 08:53 PM IST
योगी सरकारचा मोठा निर्णय; भीम आर्मीचा प्रमुख रावणची सुटका title=

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण याची कारागृहातून सुटका करण्याचा मोठा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. चंद्रशेखर याच्या शिक्षेचा कालावधी १ नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र, चंद्रशेखरच्या आईने केलेल्या विनंतीचा विचार करुन त्याची अगोदरच सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 

२०१७ साली झालेल्या सहारनपूर दंगलप्रकरणी चंद्रशेखरला अटक करण्यात आली होती. जून २०१७ पासून चंद्रशेखर तुरुंगात होता. त्याच्यावर जातीय तेढ पसरवण्याचे आरोप लावण्यात आले होते. सुरुवातीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने चंद्रशेखरला जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याच्यावर रासुकाचे कलम लावण्यात आले होते. या कलमातंर्गत कायदा व सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी संबंधित महिन्याला एका वर्षापर्यंत तुरुंगात ठेवता येऊ शकते. त्यामुळे चंद्रशेखर याच्या सुटकेसाठी करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. 

सहारनपूर दंगलीच्यावेळी शब्बीरपुर गावात झालेल्या संघर्षात दलित व्यक्तींची घरे जाळण्यात आली होती. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर ३० जण जखमी झाले होते. यानंतर चंद्रशेखरला पोलिसांनी अटक केली होती. मध्यंतरीच्या काळात भीम आर्मीकडून त्याच्या सुटकेसाठी अनेकदा निदर्शनेही करण्यात आली.