नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. रंजन गोगोई ३ ऑक्टोबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. आताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. वरिष्ठतेनुसार दीपक मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोईंचा क्रमांक लागतो.
रंजन गोगोई पुढचे सरन्यायाधीश होतील अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती. आता राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला निवृत्त होणार आहेत. कायदे मंत्रालयानं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडे पुढच्या सरन्यायाधीशपदासाठीच्या नावाची शिफारस मागितली होती. सरन्यायाधीश सगळ्यात वरिष्ठ न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस करतो, अशी परंपरा आहे.
रंजन गोगोई यांची २८ फेब्रुवारी २००१ साली गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. गोगोई पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही होते. १२ फेब्रुवारी २०११ला गोगोईंना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते.
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये रंजन गोगोई हेदेखील होते. इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांनी अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर आक्षेप घेतले होते.