लग्नाआधीच होणाऱ्या बायकोला घेऊन फरार झाला तरुण; पोलिसांनी ताब्यात घेऊन लावलं लग्न

दोघेही गायब झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांत देखील तक्रार करण्यात आली होती. मात्र नंतर दोघांनी ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली

Updated: Dec 5, 2022, 05:46 PM IST
लग्नाआधीच होणाऱ्या बायकोला घेऊन फरार झाला तरुण; पोलिसांनी ताब्यात घेऊन लावलं लग्न title=

Viral News : प्रेमात काही तरुण तरुणी इतकी आकंठ बुडालेली असतात की, आपण काय करतोय याचं त्यांना भान नसतं. एकत्र येण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा निर्णय घेताना जराही मागेपुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) समोर आलाय. बिहारमध्ये एका प्रेमी युगुलाने लग्नाची तारीख येण्याआधीच पळ काढला आहे (young man ran away with his fiancee). मात्र गोंधळ उडाल्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांच्या मदतीने मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले.

दोघेही सारण जिल्ह्यातील पानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. दोघांच्याही लग्नाची तारीख नक्की करण्यात आली होती. मे महिन्यात साखरपुडाही झाला होता. पुढच्या वर्षी मे महिन्यात दोघांचे लग्न होणार होते. पण त्याआधीच तरुणाने त्याच्या तरुणीसोबत पळ काढला.

फोनवर बोलता बोलता आखली पळून जायची योजना

लग्न ठरल्यानंतर दोघेही बराच वेळ मोबाईलवर एकमेकांसोबत बोलायचे. बोलता बोलताच त्यांनी पळून जाण्याची योजना आखली. 8 नोव्हेंबर रोजी दोघांनीही घरातून पळ काढला. घरातल्यांना कळताच त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

लवकर लग्न करायचे होते म्हणून काढला पळ

पोलिसांनी दोघांचाही तपास सुरु केला होता. 2 डिसेंबर रोजी दोघेही पानापूर इथं पोहोचले. यावेळी तिथे त्यांना पळून जाण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी लग्नाची तारीख लांब असल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला असे म्हटले. आम्हाला लवकर लग्न करायचे होते म्हणून आम्ही असे केले असेही या तरुणाने सांगितले.

दरम्यान, पानापूर पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना बोलवून त्यांच्याकडे त्यांना सोपवले. यानंतर दोघांचेही लग्न लावून देण्यात आले. तिथल्याच जवळच्या एका मंदिरात हे लग्न पार पडले. या अजब लग्नाची आता सर्वच ठिकाणी चर्चा सुरु झालीय.