Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुमाताचा 123 आकडा पार करण्यासाठी एनडीएला काँग्रेसच्या 10 आमदारांची साथ मिळू शशकते. भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार, 10 पेक्षा अधिक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान 13 काँग्रेस आमदारांचे फोन बंद आहेत. हे सर्व नितीश कुमार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
भाजपा आज रात्रीपर्यंत नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आमदारांची स्वाक्षरी असणारं पत्र नितीश कुमार यांच्याकडे सोपवणार आहे. उद्या नितीश कुमार यांच्यासह भाजपा नेतेही राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचू शकतात.
बिहार विधानसभेत सध्या भाजपकडे 78 जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत. एनडीएचा मित्रपक्ष एचएएमचे 4 आमदार आहेत. यानंतर संख्याबळ 127 वर जाते. जर आरजेडीने जेडीयूच्या काही आमदारांना आपल्याकडे आणण्यात यश आलं तर काँग्रेसचे 10 बंडखोर आमदार नितीश कुमार आणि भाजपा यांचं सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
भाजपाची नजर सध्या काँग्रेसच्या 10 आमदारांवर आहे. हे आमदार वेगळे होऊन आपला गट तयार करु शकतात. तसंच सरकार स्थापनेसाठी भाजपा नितीश कुमार यांच्यासह काही अटींवर तडजोड करु शकतं. यासह सध्याच्या आमदारांची काळजीही घेतली जाईल. पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशावाह आणि जीतनराम मांझी यांचा सन्मान राखत पदं दिली जातील.
बिहारमध्ये काँग्रेसचे एकूण 19 आमदार आहेत. अशात जर 10 आमदार पक्षातून बाहेर पडत एनडीएत आले तर लालू यादव यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांनी आपण फार सहजपणे नितीश कुमार यांना सरकार स्थापन करुन देणार नसल्याचं म्हटलं आहे. पण काँग्रेसचे 10 आमदार त्यांची डोकेदुखी वाढवू शकतात.