भाजपचं टेन्शन वाढलं! बहुमतापेक्षा फक्त १ जागा जास्त

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं जोरदार कामगिरी करत २८२ जागा जिंकल्या होत्या.

Updated: May 31, 2018, 10:48 PM IST
भाजपचं टेन्शन वाढलं! बहुमतापेक्षा फक्त १ जागा जास्त title=

नवी दिल्ली : २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं जोरदार कामगिरी करत २८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे लोकसभेमध्ये २७२ हा बहुमताचा आकडा भाजपनं अगदी सहज पार केला होता. पण आता २०१८ साली भाजपची आकडेवारी २७३ जागांवर आली आहे. म्हणजेच भाजपकडे आता बहुमतापेक्षा फक्त १ खासदार जास्त आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूक लक्षात घेता यामुळे भाजपचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल. २०१४ नंतर आत्तापर्यंत १३ लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यातल्या ८ ठिकाणी भाजपचा पराभव झाला.

महाराष्ट्रातल्या पालघरमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी भंडारा-गोंदिया आणि कैरानामध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इकडे पोटनिवडणूक झाली. तर कैरानामध्ये भाजपच्या विरोधकांनी राष्ट्रीय लोकदलाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आला. याआधी उत्तर प्रदेशच्याच गोरखपूर आणि फूलपूरमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षानं एकत्र येऊन भाजपच्या दोन्ही जागा जिंकल्या.

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरूदासपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. तर मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये भाजप खासदार दिलीप सिंह भूरिया यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकही भाजपनं गमावली. राजस्थान आणि अजमेरच्या लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.