नाराज खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या, पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंना भेटणार

भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत.

Updated: Dec 9, 2019, 07:57 PM IST
नाराज खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या, पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंना भेटणार

नवी दिल्ली : भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांची भेट होणार आहे. एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

बोधवड उपसा सिंचन योजना आणि बोधवड बॅरेज संदर्भात केंद्रीय जलआयोगाने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. अजूनही राज्य सरकारच्या माध्यमातून शिफारस आली पाहिजे. राज्य सरकारच्या माध्यमातून मदत आली पाहिजे, म्हणून पवारांची भेट घेतली, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकरल्यापासून खडसे भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीररीत्या बोलूनही दाखवली आहे. दरम्यान ते पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा रंगू लागली, पण त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. त्यांना भेटायचे असले तर मी जाऊ शकतो असे विधान त्यांनी 'झी २४ तास'कडे केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत भाजपच्याच नेत्यांनी विरोधात काम केल्यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे पुरावे घेऊन दिल्लीत आले होते. ते भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते, पण भाजप नेत्यांना न भेटताच ते माघारी परतले. पक्षात कितीही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी उद्वीग्न प्रतिक्रिया त्यांनी 'झी २४ तास'कडे व्यक्त केली.

रोहिणी खडसे यांना तिकीट देण्याची माझी इच्छा नव्हती. तसेच इच्छा असूनही मला तिकीट देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. रोहीणी खडसेंचा पराभव करण्यात पक्षातील लोकांचा हात असल्याचेही ते म्हणाले. निवडणूकीत भाजपच्याच उमेदवारांना पाडण्याचे काम करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे पुरावे देणार असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे खडसे म्हणाले.