Surendra Matiala Murder: दिल्लीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कार्यालयात घुसून 8 ते 10 राऊंड फायरिंग

Crime News: दिल्लीत (Delhi) भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून भाजपा नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala) यांच्यावर गोळ्या झाडत त्यांनी हत्या केली.   

शिवराज यादव | Updated: Apr 15, 2023, 10:01 AM IST
Surendra Matiala Murder: दिल्लीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कार्यालयात घुसून 8 ते 10 राऊंड फायरिंग  title=

BJP Leader Surendra Matiala Murder: दिल्लीत (Delhi) भाजपा नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बिंदापूर पोलीस ठाण्याच्या अख्त्यारित येणाऱ्या मटियाला रोडवर शुक्रवारी रात्री भाजपा नेते सुरेंद्र मटियाला (BJP Leader Surendra Matiala) यांच्यावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. सुरेंद्र मटियाला यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना सुरेंद्र मटियाला यांची गोळ्या घालून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, दोन हल्लेखोर हेल्मेट घालून कार्यालयात घुसले आणि त्यांनी गोळ्या घालण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी 8 ते 10 गोळ्या झाडल्या, यातील 4 गोळ्या सुरेंद्र यांना लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी अवस्थेत सुरेंद्र यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुरेंद्र हे स्थानिक भाजपा नेते असून 2017 मध्ये पालिका निवडणूक लढले होते. 

सुरेंद्र मटियाला यांचे चुलत बंधू आणि साक्षीदार राम सिंग यांनी सांगितलं आहे की, ज्यावेळी हल्लेखोरांनी हल्ला केला तेव्हा कार्यालयात एकूण 4 लोक उपस्थित होते. यावेळी राम सिंग आणि इतर दोघे बसून चर्चा करत होते. तर सुरेंद्र मटियाला हे टीव्ही पाहत होते. यावेळी कार्यालयात अचानक दोन लोक दाखल झाले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

पुढे ते म्हणाले की, आम्हाला काही कळण्याआधी सुरेंद्र मटियाला यांना गोळीलागली होती. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेत आहे.