नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्यात येईल, असे भाजपने यात वचन दिले आहे. त्याचबरोबर ईटीडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना 'बेटी बचाव योजनें'तर्गत सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीत सरकार स्थापल्यानंतर १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही भाजपने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. भाजपने १० नवी आश्वासने या संकल्प पत्रात दिली आहेत.
#BreakingNews । भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ, मुलींना मोफत सायकल आणि स्कुटी देण्याचे आश्वासन दिलेय.https://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/YeFjWtXJkU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 31, 2020
दिल्लीत आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच जास्त पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुन्हा केजरीवाल यांचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता भाजपनेही जनतेला आकर्षित करण्यासाठी काही मोफत देण्याची घोषणा आपल्या संकल्प पत्रात केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मतदार आता भाजपकडे आकर्षित होणार का, याचीच उत्सुकता आहे. केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण आणि प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत विकास महत्वाचा आहे. राष्ट्रीय मुद्दे यांचा उपयोग नाही. दिल्लीला स्वायत्तेचा दर्जा देण्याचीही मागणी केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे भाजप आणि आप यांच्यात दिल्लीत मोठी चुरस दिसून येणार आहे.
१. गरिब कुटुंबांना गव्हाचे पीठ दोन रुपये किलो दराने भाजपचे सरकार आल्यानंतर देण्यात येणार आहे.
२. तसेच गरिब कुटुंबात शिकणाऱ्या मुलींना इलेक्ट्रिक स्कूटी मोफत देण्यात येणार आहे.
३. इयत्ता नववी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल दिली जाईल.
४. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना २१ वर्षांची झाल्यावर त्यांना दोन लाख रुपयांचा लाभ मिळेल.
५. १९८४ च्या दंगलीत बळी पडलेल्या मुलाच्या एका मुलाला नोकरी दिली जाईल. दंगलींमध्ये विधवा महिलांचे मासिक पेन्शन २५०० रुपयांवरून ३५०० रुपये केले जाईल.
६. २०२४ पर्यंत दिल्ली पूर्णपणे टँकरमुक्त करण्यात येईल. तसेच घरातील प्रत्येक नळातून शुद्ध पाणी दिले जाईल.
७. गरिब विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नासाठी सरकार ५१ रुपयांची विशेष भेट देण्यात येईल.
८. सर्व अपंग, विधवा, निराधार महिला आणि वृद्धांची सध्याची पेन्शनची रक्कम वाढविली जाईल.
९. पाच लाख रुपयांवर मोफत उपचार देणारी प्रधानमंत्री आयुष्मान योजना दिल्लीत राबविण्यात येईल.
१०. दिल्लीत १० नवीन महाविद्यालये आणि २०० नवीन शाळा सुरू करण्यात येतील.