काँग्रेसच्या आंदोलनात भाजपा खासदार जखमी, डोक्याला जबर दुखापत; राहुल गांधींवर केला आरोप

Rahul Gandhi News: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसने भाजपविरोधात आंदोलन केले. या दरम्यान एका भाजप खासदाराला दुखापत झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2024, 12:25 PM IST
काँग्रेसच्या आंदोलनात भाजपा खासदार जखमी, डोक्याला जबर दुखापत; राहुल गांधींवर केला आरोप title=
BJP MP Pratap Sarangi injured due to Rahul Gandhi pushed another MP

Rahul Gandhi News: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी आजदेखील संसदेत भाजपाविरोधात आंदोलन केले. यादरम्यान भाजपा खासदार प्रताप सारंगी हे संसदेत जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. प्रताप सारंगी यांचा आरोप आहे की, 'राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला आणि तो माझ्या अंगावर पडला त्यामुळं माझ्या डोक्याला मार लागला.' 

प्रताप सारंगी हे उडिसाचे खासदार आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी अन्य एका खासदाराला धक्का दिला त्यानंतर तो खासदार माझ्या अंगावर पडला. ज्यामुळं माझ्या डोक्याला जबर मार लागला. प्रताप सारंगी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात प्रताप सारंगी व्हीलचेअरवर बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्याला एक कपडा बांधून ठेवल्याचे दिसत आहे. 

राहुल गांधी यांनी दिलं स्पष्टीकरण

भाजपा खासदाराने आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी यावर उत्तर दिलं आहे, 'भाजपा खासदार येऊ देत नव्हते. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, भाजपा एमपी मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. मला ढकलतं होते तसंच मला धमकावत होते. गांधी यांनी पुढे म्हटलं होतं की, धक्काबुक्की मुळं मला काही होणार नाही. पण हा संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि आमचा हक्क आहे आत जण्याचा. पण भाजप खासदार आम्हाला आत जाण्यापासून अडवत होते.'

कोण आहेत प्रताप चंद्र सारंगी?

प्रताप चंद्र सारंगी हे भाजपचे सदस्य आहेत. ते ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातून आहेत. तसंच, सामाजिक सेवा करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते एका सामान्य कुटुंबातून येतात. प्रताप सारंगी 2004 ते 2009 पर्यंत ओडिशा विधानसभेचे सदस्य होते. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना बालासोर लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले आणि ते निवडूनदेखील आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तथा पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्रालयात राज्यमंत्री बनवले होते.