VIDEO : शपथेत अध्यात्मिक गुरुच्या नावाचा साध्वी प्रज्ञानं केला उल्लेख आणि...

खासदार म्हणून असा होता भाजपाच्या साध्वी प्रज्ञा यांचा लोकसभेतील पहिला दिवस

Updated: Jun 18, 2019, 11:22 AM IST
VIDEO : शपथेत अध्यात्मिक गुरुच्या नावाचा साध्वी प्रज्ञानं केला उल्लेख आणि...  title=

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो खासदारांच्या शपथविधीचा... पुढली पाच वर्षं संसदेत कसं चित्र दिसणार आहे, याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसली... भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या शपथविधीवेळी गोंधळ झाला. प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये शपथग्रहण सुरू केलं. त्यांनी शपथ घेताना स्वतःच्या नावाआधी आपले गुरू स्वामी पूर्ण चेतनानंद अवधेशानंद गिरी यांचंही नाव घेतलं. विरोधकांनी यावर आक्षेप घेत जोरदार गोंधळ घातला. हे संसदेच्या प्रथेला धरून नसल्याचा विरोधकांचा दावा होता. या गोंधळातच साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपली शपथ पूर्ण केली.

साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या उमेदवारी अर्जात दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या वडिलांचं नावाची सी. पी. सिंह अशी नोंद केलीय. परंतु, शपथ घेताना मात्र त्यांनी आपल्या वडिलांच्याऐवजी अवधेशानंद गिरी यांचं नाव घेतलं. अवधेशानंद गिरी यांना त्या आपले अध्यात्मिक गुरु मानत असल्या तरी रेकॉर्डमध्ये मात्र या नावाचा समावेश नाही. 

pragya-affidavits_061719060711.jpg
साध्वी प्रज्ञाचं शपथपत्र

नियमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात नोंद केलेल्या नावानुसार खासदार शपथ घेऊ शकतात. यामध्ये ते आपल्या वडिलांच्या नावाचा समावेश करू शकतात. परंतु, प्रज्ञा यांनी जे नाव घेतलं त्याचा त्यांच्या शपथपत्रात उल्लेख नाही. यामुळेच इतर सदस्यांनी त्यावर गोंधळ घातला. 

लोकसभेच्या महासचिवांनीही साध्वी यांना 'तुम्ही संविधान किंवा ईश्वराच्या नावावर शपथ घेऊ शकता' असं समजावून सांगितलं. विरोधकांच्या आक्षेपानंतर हंगामी अध्यक्षांनी सदनात रेकॉर्ड तपासण्याचा उल्लेख केला आणि त्यांचं प्रमाणपत्र काढण्यात आलं. परंतु प्रज्ञा यांनी पुन्हा याच नावासोबत शपथ घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. तिसऱ्यांदा प्रज्ञा सिंह यांनी आपली शपथ पूर्ण केली. यादरम्यान झालेल्या गोंधळानंतर साध्वी प्रज्ञा फारच रागात दिसल्या. 'कमीत कमी इश्वाराच्या नावावर तर शपथ घेऊ द्या' असं त्यांनी म्हटलं.. आणि शेवटी 'भारत माता की जय' घोषणेसहीत त्यांनी आपली शपथ पूर्ण केली.

या दरम्यान, भाजपचे अनेक खासदार आपल्या जागेवरून उभे राहत प्रज्ञा यांचं समर्थन करताना दिसले. साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळ मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना पराभूत केलंय.

ना अहवाल... ना कारवाई 

उल्लेखनीय म्हणजे, महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेला 'देशभक्त' आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा यापूर्वी वादात अडकल्या होत्या. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचारातील रॅलीच्या शेवटच्या दिवशी 'साध्वी प्रज्ञाला कधीही माफ करणार नाही' असं म्हणावं लागलं होतं. हे प्रकरण राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अनुशासन समितीकडे सोपवलं होतं. परंतु, १७ मे रोजी गोडसेंवर केलेल्या वक्तव्यावर १० दिवसांत अहवाल देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. परंतु, आता महिना उलटला तरी साध्वी प्रज्ञा यांच्यावर अद्याप ना कोणता अहवाल आला ना कारवाई झाली.