नुपूर शर्मा यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Updated: Jun 5, 2022, 05:00 PM IST
नुपूर शर्मा यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत नुपूर यांनी वादग्रस्त विधान केले होते. हे आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. या प्रकरणी भाजपने एक निवेदनही जारी केले आहे.  

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नुपुर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे देशभरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला होता. देशातील अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.तसेच मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. 

भाजपने नुपुर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.त्याच्यासोबत नवीन कुमार जिंदाल यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. 

निवेदनात काय? 

भारतीय जनता पक्षाने रविवारी नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी एक निवेदन जारी केलं. ज्यात म्हटलं आहे की, भाजप पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांचा अपमान करत नाही. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी हे निवेदन जारी केले होते. 
 
 ''भाजप अशा कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही किंवा प्रोत्साहन देत नाही. शर्मा यांच्या वक्तव्याबाबत मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत आहे,असे अरुण सिंह म्हणाले. 'भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात प्रत्येक धर्माचा विकास आणि भरभराट झाली आहे. भाजपचा सर्वपंथ समभावावर विश्वास आहे. कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही, असेही अरुण सिंह यांनी सांगितले.