Crime News : सोशल मीडियावर झालेली ओळख अनेकदा महाग पडू शकते. आधी ओळख आणि त्या ओळखीचं त्यानंतर प्रेमात रूपांतर पण शेवट मात्र खूप भयानक, अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सिरीअल किलर उदयन दास या तरूणाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसह त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
अमेरिकेमध्ये मोठा उद्योजक असल्याचं प्रोफाईल बनवत उदयन अनेकांना अमेरिकेमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन देत होता. अशाच प्रकारे त्याने पश्चिम बंगालमधील बांकुरा इथं राहणाऱ्या आकांक्षा शर्माला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं. आकांक्षा ही इंजिनिअरिंगला होती. उदयनने तिला 2016 साली नोकरीचं बनावट ऑफर लेटर देत अमेरिकेमध्ये नोकरीची ऑफर दिली.
ऑफर लेटर खोटं आहे हे आकांक्षाला माहित नव्हतं. तिने ते तिच्या घरच्यांना दाखवलं. आपली मुलीला अमेरिकेत नोकरी मिळणार असल्याने तिचं कुटुंबही आनंदात होतं. घरच्यांनी तिला यासाठी 1 लाख 20 हजार रूपये दिले. आकांक्षा नोकरीच्या आनंदात दिल्लीला गेली. तिथे उदयन तिला भेटला.
कालांनतर आकांक्षाला उदयनचं खरं रुप समजलं, याचा तिने उदयनला जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात जोरदार भांडणंही झाली. उदयन आकांक्षाला तिच्या कुटुंबीयांशी बोलू देत नव्हता, फक्त मेसेजवर बोलायला लावत होता. यादरम्यान, उदयन आकांक्षाला भोपाळला घेऊन आला. तिथं गेल्यावरही दोघांमध्ये भांडणं झाली. यातूनच उदयनने आकांक्षाची गळा दाबून हत्या केली.
धक्कादायक म्हणजे हत्या करून उदयन आकांक्षाच्या पश्चिम बंगालमधल्या घरी गेला. तिच्या आई-वडिलांनाही मारण्याचा कट त्याने रचला होता. पण यशस्वी झाला नाही.
आकांक्षाचा मृतदेह लपवला लोखंडी पेटीत
उदयनने आकांक्षाचा मृतदेह घरातच लोखंडी बॉक्समध्ये लपवून ठेवला होता. त्यावर गादी टाकून अनेक रात्र त्या लोखंडी बॉक्सवरच तो झोपत होता. दरम्यान, उदयन आकांक्षाच्या फोनवरुन मेसेज करत तिच्या कुटुंबियांशी आकांक्षा म्हणून संवाद साधत होता. त्याचबरोबर तिचं फेसबुक प्रोफाईलही अपडेट ठेवत होता.
दुसरीकडे, प्रत्यक्षात बोलणं होत नसल्याने आकांक्षाच्या कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना चौकशीमध्ये आकांक्षाचं शेवटचं लोकेशन हे भोपाळमध्ये गोविंदपुरा येथे सापडलं. पोलिसांनी आकांक्षाचे कॉल रेकॉर्ड चेक केलं तर त्यामध्ये उदयनसोबतचे रेकॉर्ड मिळाले.
पोलिसांनी उदयनला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर उदयनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र त्यानंतर आणखी एक सत्य बाहेर आलं. उदयनने 2010 मध्ये त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांचाही खून केला होता.