Brijbhushan Singh Sexual Assault: भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे (Sexual Assault) आरोप केले असून आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, बृजभूषण सिह प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये पीडित महिला कुस्तीपटूने पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबाच्या समर्थनार्थ 16 ते 17 लोकांनी साक्ष दिली आहे. तसंच हे आरोप योग्य असल्याचं सांगितलं आहे. चार्जशीटमध्ये 6 पीडित कुस्तीपटूंच्या कुटुंबीयांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे. यामध्ये त्यांचे पतीही सहभागी आहेत. एकूण 5 साक्षीदार असे आहेत, जे कुटुंबातील आहेत.
तीन सहकारी कुस्तीपटूंनी पीडितांनी दिलेल्या जबाबाच्या समर्थनार्थ साक्ष दिली आहे. याशिवाय पुरावा म्हणून कुस्तीपटूंकडून एक फोटोही देण्यात आला आहे, जो चार्जशीटमध्ये जोडण्यात आला आहे. याच फोटोच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे.
दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग करणं या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि शिक्षा दिली जाऊ शकते असं म्हटलं आहे. बृजभूषण यांच्याविरोधात कलम 354 (महिलेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणे), कलम 354A (लैंगिक छळ), कलम 354D (पाठलाग करणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे की, खटल्याला सामोरं जाण्यासाठी बृजभूषण सिंह यांना साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं. दिल्ली पोलिसांनी तपासादरम्यान 108 साक्षीदारांची चौकशी केली आहे. या साक्षीदारांमध्ये कुस्तीगीर संघटनेचे अधिकारी, प्रशिक्षक, कुस्ती स्पर्धांचे पंच यांचा सहभाग आहे. 108 पैकी 16 ते 17 साक्षीदारांनी कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला आहे.
चार्जशीटमध्ये जोडण्यात आलेला फोटो हा सिरीफोर्ट ऑडिटोरिअममधील कार्यक्रमादरम्यान काढण्यात आला होता. चार्जशीटनुसार, एका महिला कुस्तीपटूने सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे बृजभूषण सिंह यांनी तिचा विनयभंग केला.
दिल्ली पोलिसांनी चार्जशीटमध्ये सांगितलं आहे की, सहा कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, बृजभूषण सिंह यांच्याविरोधात छळ, विनयभंग आणि पाठलाग कऱण्यासारख्या आरोपांखाली खटला चालवला जाऊ शकतो आणि शिक्षा दिली जाऊ शकते.
बृजभूषण सिंह यांनी मात्र त्यांच्याविरोधातील आरोप वारंवार फेटाळले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असून, ते सिद्ध झाल्यास आपल्याला फासावर लटकवा असं आव्हानच त्यांनी दिलं आहे. दुसरीकडे आंदोलक कुस्तीपटू मात्र त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. कुस्तीपटू आपले पदकही गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते. पण त्यांना रोखण्यात आलं होतं. कुस्तीपटू सध्या आपल्या नोकरीवर रुजू झाले असले तरी इतर मार्गांनी आंदोलन मात्र कायम आहे.