Budget 2019: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते टॅक्समध्ये सूट

शुक्रवारी अंतरिम बजेट सादर होणार आहे.

Updated: Jan 31, 2019, 12:46 PM IST
Budget 2019: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते टॅक्समध्ये सूट title=

नवी दिल्ली : शुक्रवारी केंद्रीय मंत्री पियूष गोयल अंतरिम बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये नोकरी करणाऱ्या वर्गाला खूशखबर मिळू शकते. २०१४ पासून इनकम टॅक्सची सीमा वाढवण्यात आलेली नाही. 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही. पण सूट दिल्यानंतर ३ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही. यंदाच्या बजेटमध्ये सरकार इनकम टॅक्समध्ये सूट देण्यासाठी त्याची सीमा वाढवू शकते. २०१४ मध्ये देखील टॅक्स सूटची सीमा वाढवण्यात आली होती. सरकारने जर टॅक्स सूट वाढवली तर याचा सर्वाधिक फायदा मध्यम वर्गाला होणार आहे. एजेंसीच्या माहितीनुसार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मध्यम वर्गाला खूश करण्यासाठी काही पावलं उचलू शकते. त्यामुळे लोकांना टॅक्समध्ये आणखी काही सूट मिळू शकते. सरकार इनकम टॅक्स सूटची सीमा २.५ लाखाहून ५ लाख करु शकते. काही रिपोर्ट्सनुसार, मात्र ही सीमा ५० हजारापर्यंत वाढवली जाऊ शकते.

जर सरकारने ही सीमा ५० हजारापर्यंत वाढवली तर सरकारला ३७५० कोटींचं नुकसान होऊ शकतं. सध्या २.५ ते ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स लागतो. ५ लाख ते १० लाखापर्यंत २० टक्के टॅक्स लागतो. १० लाखापेक्षा अधिकच्या उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स लागतो.

सेक्शन ८० सी नुसार लोकांना १.५ लाखापर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते. २०१४ मध्ये ही सीमा वाढवण्यात आली होती. ही सीमा आता २.५ लाख केली जाऊ शकते. यामुळे लोकांची बचत वाढेल. होम लोनवर 2 लाखापर्यंत टॅक्स सूट मिळते. याची सीमा देखील ३ लाखापर्यंत केली जाऊ शकते.