बुर्ज खलिफाचा अनोखा फोटो, फोटोसाठी छायाचित्रकाराने पाहिली ७ वर्षे वाट

छायाचित्रकाराच्या ७ वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश   

Updated: Jan 18, 2020, 09:57 AM IST
बुर्ज खलिफाचा अनोखा फोटो, फोटोसाठी छायाचित्रकाराने पाहिली ७ वर्षे वाट

मुंबई : आताच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला कोणतीही गोष्टी तात्काळ हवी असते. एखाद्या गोष्टींसाठी काही काळ वाट पाहण्याची मानसिकता आता लोप पावत चालली आहे. पण फक्त छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यात काही अनोखे क्षण टिपण्यासाठी त्या वेळेच्या प्रतिक्षेत असतात. या प्रतिक्षेत काही वेळा त्यांचा प्रयत्न अयशस्वी देखील ठरतो. पण म्हणतात मेहनतीचं फळ फार गोड असंत. असं झालयं छायाचित्रकार जोहैब अंजुम सोबत. अनेक वर्षापासून पाहिलेलं या छायाचित्रकाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.

मूळचां पाकिस्तानचा असलेला जोहैब अंजुमने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खिलाफाचा अनोखा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. इमारतीवर वीज पडताना अत्यंत बोलका फोटो त्याने काढला आहे. या क्षणासाठी जोहैब अंजुमने चक्क ७ वर्ष प्रतिक्षा केली आहे. 

अंजुम एका रियल इस्टेट कंपनीत छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहे. या अनोख्या फोटोसाठी त्याला सात वर्ष वाट पाहावी लागील. अखेर शुक्रवारी रात्री त्याची प्रतिक्षा संपली. याआधी त्याने फोटोसाठी पूर्ण रात्र पावसात घालवली होती. 

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'हवामान ऍप्सच्या मदतीने मला कळाले की शुक्रवारी रात्री दुबईच्या काही ठिकाणी वादळ येणार आहे. म्हणून वादळ नक्की कोणत्या दिशेने येणार याचा मी अभ्यास केला. त्यानंतर बुर्ज खलिफाच्या मागील कोस्टल भागातून वादळाचे आगमन होणार होतं.' हा फोटो कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर अंजुमने देवाचे आभार मानले.