कोलकाता : देशभरात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटीफिकेशन जारी केलंय. या कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील बिगर मुस्लीम निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये रान पेटवलं आहे. दरम्यान आता पंतप्रधान मोदी कोलकतामध्ये दाखल होत आहेत.
पंतप्रधान मोदी आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. कोलकाता पोर्टच्या १५० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणारेत. याच दौऱ्यात मोदी ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोदी इथे दाखल होण्यापूर्वीच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मिलेनियम पार्कचा भगवा रंग बदलून तिथे पांढरा रंग चढवलाय. याच मिलेनियम पार्कमधल्या हावडा ब्रिजवर म्युझिकल सिस्टिमचं उदघाटन करण्यासाठी मोदी येणार आहेत.
३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या हिंदू, बौद्ध, शिख, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झालाय. सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे.