श्रीनगर - लेह महामार्गावर बनणार आशियातला सर्वात लांब 'जोजिला' सुरुंग

केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीरमधला महत्त्वपूर्ण जोजिला सुरुंग बनवण्यासाठी बुधवारी मंजुरी दिलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 4, 2018, 02:08 PM IST
श्रीनगर - लेह महामार्गावर बनणार आशियातला सर्वात लांब 'जोजिला' सुरुंग title=

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीरमधला महत्त्वपूर्ण जोजिला सुरुंग बनवण्यासाठी बुधवारी मंजुरी दिलीय. 

सध्या, 'जोजिला' पार करणं कठिण... 

एकूण ६८०९ करोड रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. या सुरुंगाचा वैशिष्ट्य म्हणजे, हा जगातील सर्वात लांब सुरुंग ठरेल. यामुळे सध्या जोजिला पास पार करण्यासाठी जो साडे तीन तासांचा वेळ लागतो तो केवळ  १५ मिनिटांवर येईल. 

श्रीनगर - कारगिल रोडवर 'जोजिला'

सोनमार्गपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेला 'जोजिला' हा पर्वतीय रस्ता श्रीनगर - कारगिल - लेह राष्ट्रीय महामार्गावर ११,५७८ फुटांच्या उंचीवर आहे. काश्मीर खोऱ्यात तसंच लडाख भागात कोणत्याही ऋतुमध्ये संपर्क साधण्यासाठी या भागातील सुरुंग उपयोगी ठरू शकेल. डिसेंबर ते एप्रिल महिन्यात थंडीच्या दिवसांत हिमवर्षावाच्या कारणानं या भागाचा भारताशी संपर्क तुटतो... या सुरुंगानंतर श्रीनगर, कारगिल, लेह या भागाशी भारताचा संपर्क कोणत्याही ऋतूत तुटू शकणार नाही. 

कामासाठी लागणार सात वर्ष 

रस्ते निर्माण तसंच महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सात वर्षांत या दुपदरी (येणारा - जाणारा मार्ग) महामार्गाचं काम पूर्ण होऊ शकेल. जिथे उणे ४५ डिग्री तपमान जातं अशा भौगोलिक क्षेत्रातील हा सुरुंग म्हणजे इंजिनिअरींगचा उत्तम नमुना ठरू शकेल.