Crime News : ग्राहक बनून गेलेल्या कॉन्स्टेबलला बेदम मारहाण, कॉल गर्लसह दलाल पैसे घेऊन पसार...

Crime News : वेश्या व्यवसाय थांबवण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र पोलिसच त्या सापळ्यात अडकले. आरोपींनी पोलिसांनाच चुना लावल्याने सर्वच ठिकाणी या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरुय

Updated: Jan 9, 2023, 07:10 PM IST
Crime News : ग्राहक बनून गेलेल्या कॉन्स्टेबलला बेदम मारहाण, कॉल गर्लसह दलाल पैसे घेऊन पसार... title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : अवैधरित्या सुरु असलेला देहविक्रीचा व्यापार थांबवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात असतात. कधी कधी अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी या व्यवसायात ढकलेले जाते. तर काहीवेळा गैरकृत्याचे प्रकारही समोर येतात. हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रयत्न करण्यात येतात. कधी कधी वेश्याव्यवसाय रॅकेट (Prostitution Racket) उघड करण्यासाठी पोलीसांकडूनच सापळा रचला जातो. अनेकवेळा हा प्रयत्न यशस्वी होतो. मात्र एका प्रकरणात पोलिसांवरच हा सापळा उलटला आणि आरोपींनी पळ काढला आहे.

पोलिसांचेच पैसे घेऊन काढला पळ

हरियाणामध्ये अवैधरित्या सुरु असलेला देहविक्रीचा व्यापार थांबवण्यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला होता. मात्र त्याच पोलिसच अडकले आणि देवविक्री करणाऱ्या कॉल गर्ल (Call Girl) आणि दलालांनी पळ काढला. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये खोटे गिऱ्हाईक बनून सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पण पोलिसांनाच गुंगारा देत आरोपी पसार झाले. देहविक्री करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आखलेली योजना पूर्णपणे धुळीस मिळाली. आरोपींनी पोलिसांचे पैसे घेऊन पळ काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यापार

गुरुग्रामच्या सेक्टर 56 परिसरात फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांना पकडण्यासाठी प्लॅन आखला होता. शुक्रवारी रात्री एका पोलीस कर्मचाऱ्याने ग्राहक असल्याचे भासवून दलालाच्या नंबरवर फोन केला. त्यानंतर दलालाने जागा आणि दर ठरवला. व्हॉट्सअॅपवर दोन मुलींचे फोटो पसंद केल्यानंतर आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला रात्रभरासाठी 20 हजार रुपये मागितले.

पोलिसांनाच दिला गुंगारा

यानंतर दलालाने दोन्ही मुलींना एका कारमध्ये घेऊन सेक्टर 56 मधील शिव गेस्ट हाऊस गाठले. मात्र तिथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. आरोपी पोहोचण्याआधीच गुरुग्राम पोलिसांची अनेक वाहने आणि त्यांच्या खासगी वाहनांच्या आसपास उभी होती. ग्राहक म्हणून फोनवर बोलणारा पोलीस कर्मचारी आरोपीच्या गाडीकडे गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की, गाडीच्या मागच्या सीटवर दोन मुली बसल्या होत्या. त्यांच्यासोबत गाडीत एक ड्रायव्हर आणि दुसरा तरुण बसला होता.

यानंतर दलालाने पैसे दे आणि मुलींना घेऊन जा असे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने 500 - 500 नोटा देत सहकाऱ्यांना इशारा केला. हा इशारा गाडीत बसलेल्या तरुणाने पाहिला आणि त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. आरोपींनी पैसे घेऊन तिथून पळ काढला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या गाडीलाही धडक दिली. यानंतर तिथे असलेल्या पोलिसांच्या पथकांनी आरोपींच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र धुक्यामुळे पोलिसांच्या पथकांना धूळ चारत आरोपी गायब झाले.