विषारी सॅनिटायजरपासून सावधान; CBIकडून अलर्ट जारी

सावधान, तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायजर विषारी तर नाही ना?

Updated: Jun 16, 2020, 06:25 PM IST
विषारी सॅनिटायजरपासून सावधान; CBIकडून अलर्ट जारी title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी हँड सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हँड सॅनिटायजरचा वापर आणि मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु हँड सॅनिटायजर घातकही ठरु शकत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयने CBI राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलिसांना ऑनलाईन पेमेंट फसवणूक आणि विषारी पदार्थांपासून बनलेल्या सॅनिटायजरचा पुरवठा करणाऱ्या टोळीबाबत अलर्ट जारी केला आहे. इंटरपोलकडून मिळालेल्या इनपूटच्याआधारे हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सीबीआयने इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील पोलीस आणि इतर एजन्सीजला सतर्क केलं आहे. अलर्टनुसार, सीबीआयने सांगितलं की, फसवणूक करणारी टोळी मिथेनॉलपासून सॅनिटायजर बनवत असल्याची माहिती आहे. मिथेनॉलपासून बनलेलं सॅनिटायजर अतिशय विषारी असून अशाप्रकारच्या सॅनिटाजरमुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

फसवणूक करणारी टोळी कोरोना व्हायरसशी संबंधित वैद्यकीय उपकरणं खरेदी करणाऱ्या रुग्णालयांशी आणि अन्य संस्थांशी संपर्क करुन ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली, ऑनलाईन बुकिंग करताना फसवणूक केली जात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. फसवणूक करणारी ही टोळी ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर कोणतंही उपकरण पाठवत नसल्याचं समोर आलं आहे.

काही इतर देशांमध्ये अशाप्रकारचे प्रकार उघडकीस आल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सॅनिटायजरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे नकली सॅनिटायजरचं उत्पादन करण्यातही वाढ झाली आहे. नकली सॅनिटायजर बनवताना त्यात मिथेनॉलचा उपयोग करण्यात येत असून लोकांची फसवणूक होत आहे.