आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं

Updated: Apr 9, 2019, 01:17 PM IST
आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...  title=

नवी दिल्ली / पाटणा : चारा घोटाळ्याच्या विविध प्रकरणांत लालू प्रसाद यादव यांना जामीन देण्याला सीबीआयनं विरोध दर्शवलाय. सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उत्तर देताना सीबीआयनं लालूंच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप नोंदवलाय. 'लालू यादव रुग्णालायातून राजकीय गोष्टी साध्य करत आहेत. तसंच आजारपणाच्या निमित्त देत जामीन मागत लालू सर्वोच्च न्यायालयाचीही दिशाभूल करत आहेत' असं सीबीआयनं म्हटलंय. त्यांना लोकसभा निवडणुकी दरम्यान तुरुंगाबाहेर यायचं असल्यानं त्यांची ही नाटकं सुरू असल्याचंही मत सीबीआयनं न्यायालयासमोर नोंदवलंय. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लालूंना आत्तापर्यंत मिळालेली शिक्षा जोडली असता २७.५ वर्षांची शिक्षा त्यांना मिळालीय. अशावेळी लालूंचा जामीन अर्ज फेटाळला जावा. 

लालू आपल्या शिक्षेतील बहुतांश कालावधी तुरुंगातल्या एका विशेष रुग्णालयाच्या वार्डातच राहण्यात यशस्वी ठरलेत. मुख्यमंत्री असताना लालूंच्या वर्तवणुकीनं देशाच्या अंतराम्याला हादरवून टाकलं होतं, असंही सीबीआयनं न्यायालयासमोर म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं. त्यावर सीबीआयनं आपलं हे मत नोंदवलंय. सीबीआयच्या या उत्तरानंतर सर्वोच्च न्यायालय बुधवारी लालूंच्या जामीन अर्जावर आपला निर्णय सुनावणार आहे.

यापूर्वी झारखंड उच्च न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. लालूंचं वय ७१ वर्ष असून त्यांना डायबिटीज, बीपी, हृदयरोग यांसोबतच अनेक आजार आहेत. त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्येक दिवश त्यांना १३ प्रकारच्या औषधांचं सेवन करावं लागतं, असं सांगत त्यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला हातो.