बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की...

Pathan Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झालाय. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने हा वाद पेटला आहे.

Updated: Dec 18, 2022, 04:21 PM IST
बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की... title=

Pathan Controversy : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) यांचा पठाण हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झालाय. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने हा वाद पेटला आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीला आक्षेप घेत हिंदुत्वादी संघटना आणि भाजपने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे.

अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. भगव्या रंगाच्या वादावर आठवले यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत इशारा आहे. "या सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे आमचा पण रंग भगवा आहे," अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

बेशरम शब्द काढला पाहिजे

भगव्या रंगासोबत रामदास आठवले यांनी 'बेशरम रंग' गाण्याच्या नावावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी केली आहे. "बेशरम म्हणून कुठला ही रंग नसतो. तो शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करु," असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

हिंदू असाल तर पठाण चित्रपट पाहू नका - खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (sadhvi pragya singh thakur) यांनीसुद्धा पठाण चित्रपटातील गाण्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. जर तुम्ही खरोखरच हिंदू असाल तर पठाण चित्रपट पाहू नका. पोटावर लाथ मारून त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करा. भगव्याचा अपमान करणार्‍यांचे तोंड फोडून हातात द्यायला हवं, असा इशारा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिला होता.