नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात किंमतीमध्ये मोठी वाढ केलीय. यापुढे किमान निर्यात किंमत प्रतिटन ८५० डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे देशांतर्ग बाजारात वाढलेल्या कांद्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये कांद्याच्या निर्यात किंमतीवरील बंधनं पूर्णपणे शिथील करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी हे निर्णय घेण्यात आला आहे. निर्यात हे बंधन ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. गेल्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे ५० ते ६५ रुपयांवर गेल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणात पुढे आलंय.
त्याचप्रमाणे यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात १० टक्के घट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय़. ही घट लक्षात घेऊन २००० टन कांद्यांची आयात करण्याचे निर्देश एमएमटीसीला दिले आहेत. त्याचप्रमाणे नाफेडला देशांतर्गत कांदा खरेदी वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
देशातील कांद्याच्या किंमतीने गेल्या काही महिन्यांमध्ये नागरिकांना चांगलेच रडवले आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना कसा दिलासा मिळतो, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.