Mission Chandrayaan-3 Updates in Marathi: चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करुन आठवडा झाला आहे. भारताच्या या मोहिमेमुळे जगाला अनेक नव्या गोष्टींची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून भारतीय संशोधक चंद्राच्या पृष्ठभागावर आढळलेल्या गोष्टींचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवेकडील पृष्ठभागावर उतरलेल्या विक्रम लँडरचा पहिला फोटो शेअर केला आहे. इस्रोने हा फोटो शेअर केला आहे.
इस्रोने ट्वीट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की "चांद्रयान 3....स्माईल प्लीज. आज सकाळी प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो काढला. हा फोटो रोव्हरच्या ऑनबोर्ड नॅव्हिगेशन कॅमेऱ्यातून (NavCam) काढण्यात आला आहे".
चांद्रयान 3 मोहिमेसाठी नॅव्हकॅमला लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टमने (LEOS) तयार करण्यात आलं आहे. हे दोन नॅव्हकॅम प्रज्ञान रोव्हरमध्ये एका बाजूला बसवले आहेत. प्रत्यक्षात रोव्हरचे एकूण वजन 26 किलो आहे. हे तीन फूट लांब, 2.5 फूट रुंद आणि 2.8 फूट उंच असून सहा चाकांवर चालते.
Chandrayaan-3 Mission:
Smile, please
Pragyan Rover clicked an image of Vikram Lander this morning.
The 'image of the mission' was taken by the Navigation Camera onboard the Rover (NavCam).
NavCams for the Chandrayaan-3 Mission are developed by the Laboratory for… pic.twitter.com/Oece2bi6zE
— ISRO (@isro) August 30, 2023
रोव्हर 500 मीटरपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागात आत जाऊ शकतो. याचा वेग 1 सेमी प्रतीसेकंद आहे. जोपर्यंत सूर्याचा प्रकाश मिळत आहेत, तोपर्यंत पुढील 13 दिवस हे चंद्राच्या पृष्ठभागावर काम करणार आहे. तोपर्यंत आपल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग आणि विक्रम लँडरचे फोटो काढत राहील.
तुम्ही जर फोटो पाहिला तर प्रज्ञान रोव्हरमध्ये सोलार पॅनल दिसत असेल. सूर्याकडून ऊर्जा घेत तो ती रोव्हरला देत राहील. यानंतर खाली सोलार पॅनल हिंज दिसत आहे. हे सोलार पॅनल आणि रोव्हरला जोडून ठेवण्याचं काम करतं. यानंतर नेव्ह म्हणजे नॅव्हिगेशन कॅमेरा आहे. हे दोन कॅमेरे आहेत. यातील एक कॅमेरा रस्ता शोधण्याचं तर दुसरा कॅमेरा मार्ग ठरवण्यात मदत करतो.
सोलार पॅनलच्या खाली त्याला सांभाळणारा सोलार पॅनल होल्ड डाऊन आहे. तसंच खाली सहा चाकं आहेत. याशिवाय रॉकर बोगी आहे. ही रॉकर बोगी खडबडीत पृष्ठभागावर व्यवस्थित चालण्यास मदत करते. याशिवाय रोव्हरच्या खालच्या बाजूला रोव्हर होल्ड डाऊन आहे. जेव्हा रोव्हर हालचाल करत नसेल तेव्हा तो एकाच जागी घट्टपणे उभा असेल. जेणेकरुन भविष्यात तो परत मिळवता येईल.