Char Dham Yatra VIDEO : केदारनाथ मंदिराची कवाडं उघडतानाची रोमहर्षक दृश्यं पाहिली?

.....आणि मंदिर परिसरात हर हर महादेवचाच जयघोष सुरु झाला. 

Updated: May 9, 2019, 08:38 AM IST
Char Dham Yatra VIDEO : केदारनाथ मंदिराची कवाडं उघडतानाची रोमहर्षक दृश्यं पाहिली?  title=

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे असणाऱ्या केदारनाथ मंदिराची कवाडं गुरुवारी पहाटे भाविकांसाठी खुली करण्यात आली. ९ मे रोजी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबतच केदारनाथ मंदिराचे द्वार ५ वाजून ३३ मिनिटांनी खुले झाले आणि मंदिर परिसरात हर हर महादेवचाच जयघोष सुरु झाला. मंत्रोपचार आणि या जयघोषांमुळे मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेने मंदिर परिसरातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये द्वार उघडतानाची सुरेख दृश्य पाहायला मिळत आहेत. लाखो भाविकांची श्रद्धा असणारी चारधाम यात्रा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. ज्यानंतर आता येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय आणि परदेशी नागरिकांचाही ओघ या श्रद्धास्थळांकडे असेल. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा अनुक्रमे चार ठिकाणांचा यात समावेश होतो. यातील बद्रीनाथ मंदिराची कवाडं १० मे, म्हणजेच शुक्रवारी उघडण्यात येतील. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हिमवृष्टीमुळे चारधान यात्रेत येणाऱ्या या मुख्य मंदिरांची कवाडं बंद असतात. जी, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये पुन्हा खुली होतात. 

यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गढवाल हिमालयाच्या पर्यवरांगांमध्ये येणाऱ्या या स्थळांवर चारधाम यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हजारो भाविकांसमक्ष खुली करण्यात आली आणि भक्तिच्या नि:स्वार्थ प्रवासाला सुरुवात झाली. 

दरम्यान, केदारनाथ मंदिर परिसराविषयी फक्त भाविकांमध्येच नव्हे तर, परदेशी पर्यटकांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळतं. रुद्रप्रयाग येथे समुद्रसपाटीपासून साधारण ११ हजार ७५५ फुटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. शासनाकडूनही चारधाम यात्रेला होणारी अपेक्षित गर्दी पाहता मंदिर परिसरात भक्तांच्या वास्तव्यासाठी काही व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ज्याअंतर्गत बांधण्याच आलेल्या तंबूंमध्ये ३००० भक्त एकाच वेळी राहण्याची सोयही करण्यात आली आहे. 

सध्याच्या घडीला केदारनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बर्फ साठला असला तरीही, मंदिराकडे जाणारी वाट मात्र मोकळी करण्यात आल्याची माहिती केदारनाथ- बद्रीनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष मोहन लाल थापलियाल यांनी आएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.