दाढी कापण्याच्या वादात ट्विटर कंपनीही अडचणीत, ट्विटरविरोधात पहिल्यांदाच गुन्हा दाखल

अब्दुल समद प्रकरणामुळं ट्विटर विरुद्ध सरकार वादात नव्या प्रकरणाची भर पडली. 

Updated: Jun 16, 2021, 09:29 PM IST
दाढी कापण्याच्या वादात ट्विटर कंपनीही अडचणीत, ट्विटरविरोधात पहिल्यांदाच गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : देशात हिंदू विरुद्ध मुसलमान वातावरण तयार करून धार्मिक तेढ कशी निर्माण केली जाते, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय.. उत्तर प्रदेशात एका बुजुर्ग मुस्लिमाची दाढी कापण्यावरून सुरू झालेल्या या वादात ट्विटर कंपनी देखील अडचणीत आली... काय आहे हा वाद, चला पाहुयात...

ट्विटरवर का दाखल झाला गुन्हा?

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील 5 जूनची ही घटना... काही लोकांनी आपलं अपहरण करून दाढी कापली, असा एफआयआर अब्दुल समद नावाच्या एका मुस्लिम बुजुर्गानं पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला... हल्लेखोरांनी जय श्रीरामचे नारे द्यायला भाग पाडलं... मला मारहाण करणारे हिंदू होते, असा आरोप समद यांनी केला होता..

मात्र पोलीस तपासात हे सगळे आरोप खोटे असल्याची बाब समोर आली.

तक्रारदार अब्दुल समद आरोपींना आधीपासूनच ओळखत होते. मारहाण करणा-या 10 जणांपैकी 5 मुसलमान होते. धार्मिक कारणावरून ही मारहाण झाली नव्हती. तर पूर्ववैमनस्यातून ही मारहाण करण्यात आली. समद यांनी जाणीवपूर्वक मुस्लीम आरोपींची नावं लपवून ठेवली. आपापसातील वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न समद यांनी केला, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल समद यांची दाढी कापतानाचा हा व्हिडिओ ट्विटरवरून तुफान व्हायरल झाला... या व्हिडिओमुळं धार्मिक तेढ निर्माण झाली. नव्या नियमानुसार ट्विटरनं हा व्हिडिओ सेन्सॉर करायला हवा होता. मात्र कंपनीनं तसं न केल्यानं आता ट्विटरविरोधात पहिल्यांदाच गाझियाबाद  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप ट्विटरवर आहे.

अब्दुल समद प्रकरणामुळं ट्विटर विरुद्ध सरकार वादात नव्या प्रकरणाची भर पडली. सोशल मीडियामुळं देशातली अंतर्गत सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते, हेच या प्रकरणावरून स्पष्ट होतंय.