डॉक्टर (Doctor) हा देव असतो असे अनेकदा म्हटलं जातं. डॉक्टर त्यांच्या रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतात. मात्र काही डॉक्टर याला अपवाद ठरतात. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आपला जीव गमावाव्या लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईच्या (Chennai) एका नवोदित महिला फुटबॉलपटूला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागलाय. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला.
चेन्नईतील एका युवा महिला फुटबॉलपटूला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला आहे. फुटबॉलपटू प्रिया आर हिच्या पायाची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली आणि तिचा पाय काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रियेनंतर प्रियाला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला. "प्रियाने 7 नोव्हेंबरला तिच्या पायाच्या दुखण्याबाबत सांगितले होते. पण डॉक्टरांनी तिचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. जर डॉक्टरांनी तिच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले असते तर तिला वाचवता आले असते. शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला," असे प्रियाचा भाऊ लॉरेन्स म्हणाला.
7 नोव्हेंबरला पाय दुखू लागल्याने प्रियावर शहरातील पेरीफेरल शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रियाच्या उजव्या पायाच्या लिगामेंटची आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रियाचा मृत्यू झाला. दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान, प्रिया बेशुद्ध झाली आणि तिला राजीव गांधी सरकारी रुग्णालयाच्या (RGGGH) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. हृदय, मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्याने प्रियाचा 15 नोव्हेंबर मृत्यू झाला.
प्रियाला पकडणे कठीण होते. ती खूप वेगवान धावपटू होती, असे तिच्या मित्रांनी सांगितले. आर प्रियाचे पार्थिव कनिगापुरम येथील तिच्या घरी आणण्यात आल्यानंतर मित्र आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. "प्रिया! उठ आणि बूट घाल, चल फुटबॉल खेळूया," असे ओरडत तिचे मित्र रडत होते. प्रियाच्या भावाला तिची जर्सी पाहताच अश्रू अनावर झाले. "ती खूप वेगवान धावपटू होती. आमच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसह ती राष्ट्रीय आणि जिल्हा स्पर्धांमध्ये खेळली. ती एक चांगली डिफेंडर होती," तिचे प्रशिक्षक ए जोएल म्हणाले.
प्रियाच्या नातेवाईकांनी सांगितले की, प्रियाला त्या रात्री तीन वेळा उठली होती. पाय दुखत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिला औषध देण्यात आले आणि ती झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता डॉक्टरांनी प्रियाला राजीव गांधी रुग्णालयात हलवले. प्रियाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे डॉक्टरांनी प्रियाला राजीव गांधी रुग्णालयात हलवले. यानंतर प्रियाच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. या चाचण्यांनंतर डॉक्टरांनी प्रियाच्या उजव्या पायाच्या पेशी काम करत नसल्याचे सांगितले. प्रियाच्या पायावर शस्त्रक्रिया करणे हाच तिचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर 9 नोव्हेंबरला प्रियाचा पाय शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. प्रियावर सोमवारी आणखी एक शस्त्रक्रिया झाली.
रुग्णालयातील डॉ. ई थेरनीराजन यांनी सांगितले की, 'प्रियाच्या पायाचे स्नायू तुटल्यामुळे मायोग्लोबिन आणि क्रिएटिनिन नावाच्या प्रोटीनची पातळी वाढली होती. त्यामुळे तिची किडनी, यकृत आणि हृदय निकामी झाले. प्रियाचे डायलिसिस करण्यात आले पण तिची प्रकृती खालावत गेली.'
"ती हसत आत गेली आणि 'टाटा' म्हणाली. शस्त्रक्रियेनंतरही ती आमच्याशी हसत हसत बोलत होती. त्या रात्री तिने पाय दुखत असल्याची तक्रार केली आणि डॉक्टरांनी औषध दिले. सकाळी, ती पुन्हा वेदनांनी रडू लागली तेव्हा पुन्हा तिला औषध दिले. आम्ही वरिष्ठ डॉक्टरांना सांगितले तेव्हा त्यांनी तपासणी केली. ज्यामध्ये पायाला रक्तपुरवठा थांबल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब तिला राजीव गांधी रुग्णालयात हलवले. आईने प्रियाला मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास अतिदक्षता विभागात (ICU) शेवटचे पाहिले. तिने डोळे उघडले आणि आईकडे पाहिले. तिचे डोळे पिवळसर होते. पण आज सकाळी 7.15 वाजता प्रियाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले," असे प्रियाच्या भावाने सांगितले.