देशात चिकन बिर्याणी आणि मसाला डोसा लोकप्रिय

भारतात सर्वाधिक पसंती कोणत्या खाद्यपदार्थ्याला... ?

Updated: Dec 24, 2019, 06:46 PM IST
देशात चिकन बिर्याणी आणि मसाला डोसा लोकप्रिय title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : भारत हा खंडप्राय देश आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या सवयी आहेत. खाण्यातली भारतीयांची राष्ट्रीय आवड काय तर ती आहे चिकन बिर्याणी. भारतीय चिकन बिर्याणी खाण्याचे शौकीन असल्याचं एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या पाहणी अहवालातून समोर आलं आहे. भारतात एका मिनिटाला ९५ बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या जातात. तशी बिर्याणी ही पर्शियातून आलेला खाद्यपदार्थ आहे. 

मोगलांनी बिर्याणी भारतात लोकप्रिय केली. आज भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या चवीच्या बिर्याणी चाखायला मिळतात. अगदी साध्याभातापासून बासमती भातापर्यंत कोणताही भात बिर्याणीची चव आणि लज्जत वाढवतो. भारतातल्या प्रत्येक शहरातली बिर्याणी तिची वेगळी चव राखून आहे.

बिर्याणी खालोखाल भारतात मसाला डोसा सर्वाधिक खाल्ला जातो. मसाला डोसा हा तसा दक्षिणेकडील राज्यातील खाद्यपदार्थ पण आज भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला डोसा खायला मिळू शकतो. बिर्याणीशिवाय भारतीयांना डोसा, डाळखिचडी, दहीभात, मेथी मलाई पनीर, इडली, सांबरवडा, गुलाबजाम आवडत असल्याचं सर्व्हेक्षण सांगतं. 

जागतिकीकरणाच्या रेट्यात बर्गर पिझ्झानं भारतात शिरकाव केला. पण भारतीयांच्या मनात अजूनही देशी पदार्थांनीच घर केल्याचं हा अहवाल सांगतो. मग काय होऊन जाऊ दे एक चिकन बिर्याणी.