Chiken in Veg Biryani: व्हेज बिर्यानीमध्ये सापडले चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

Chiken in Veg Biryani: या घटनेमुळे हॉटेल आणि फूड डिलीव्हरी कंपन्यांनी सजग असणे गरजेचे असल्याचे अधोरेखीत होते. तसेच सोशल मीडियाची ताकद देखील यातून दिसून येते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 12, 2023, 04:53 PM IST
Chiken in Veg Biryani: व्हेज बिर्यानीमध्ये सापडले चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप title=

Chiken in Veg Biryani: श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थ खाणे टाळतात. हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा देखील विषय असतो. पण याच श्रावण महिन्यात ऑनलाइन ऑर्डरच्या नादात वाराणसीच्या रहिवाशाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. कारण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शाकाहारी पनीर बिर्याणीमध्ये त्याला चिकनचे तुकडे सापडले आहेत. अश्विनी श्रीवास्तव या ट्विटर यूजरने यासंदर्भात ट्विट केले असून आपल्या मित्रासोबत ही घटना घडल्याचा दावा केला आहे.

हे ट्विट करताना अश्विनीने ऑर्डर इनव्हॉइस आणि पनीर बिर्याणी बॉक्सचा व्हिडिओ देखील सोबत जोडला आहे.

अश्विनीच्या मित्राने नेहमीच्या सवयीप्रमाणे ऑर्डर केली. ती चिकन बिर्याणी असेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. कारण पनीर बिर्याणीमध्ये सामान्यतः आवरणात गुंडाळलेले पनीर असते. पण डिश चाखल्यानंतर त्याला जोरदार धक्का बसला. त्यात चिकन मिश्रित असल्याने त्याची मोठी निराशा झाली. 

'माझा मित्र श्रावणाच्या या पवित्र महिन्यात त्याच्या कुटुंबासह वाराणसीमध्ये आहे. त्याने @zomato द्वारे प्रसिद्ध '@BehrouzBiryani' वरून फॅमिली पॅक पनीर व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती, पण त्यांनी त्याऐवजी चिकन बिर्याणी खायला लावली!', असे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

सुरुवातीला, त्यांना ही खरोखर चिकन बिर्याणी आहे हे देखील कळले नाही कारण पनीर बिर्याणीचे पनीर देखील आच्छादनात गुंडाळलेले असते आणि त्यांनी पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली होती. चव घेतली तेव्हाच त्यांच्या गडबड असल्याचे लक्षात आल्याचे अश्विनीने सांगितले.

ऑर्डर बॉक्सपासून ते बिलिंगपर्यंत सगळीकडे पनीर व्हेज बिर्याणी लिहिली आहे, मग त्याऐवजी चिकन बिर्याणी का देण्यात आली? वाराणसीतील झोमॅटो आणि प्रसिद्ध बेहरूझ बिर्याणी लोकांच्या धार्मिक श्रद्धांशी का खेळत आहे का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. 

या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्राहकाने बेहरुज हॉटेल आणि फूड डिलीव्हरी करणाऱ्या झोमॅटोशी संपर्क साधला. यावेळी Zomato आणि Behrouz Biryani या दोघांनीही तक्रार तात्काळ मान्य केली. 

या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही कार्यवाही करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच झोमॅटोने या घटलेल्या घटनेबद्दल माफी मागितली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. बेहरूज बिर्याणीने व्हायरल झालेल्या ट्विटची दखल घेतली.

या घटनेमुळे हॉटेल आणि फूड डिलीव्हरी कंपन्यांनी सजग असणे गरजेचे असल्याचे अधोरेखीत होते. तसेच सोशल मीडियाची ताकद देखील यातून दिसून येते.