चीनच्या बुलेटचा भारताला धोका? नक्की काय चालंलय तिबेटमध्ये

चीनी सरकारने भारतीय सीमेपर्यंत बुलेट ट्रेन आणण्याचा काम सुरू केले आहे.  

Updated: Mar 10, 2021, 10:35 AM IST
चीनच्या बुलेटचा भारताला धोका? नक्की काय चालंलय तिबेटमध्ये title=

नवी दिल्ली : लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर चीनला भारतीय जवानांनी चांगलाच धडा शिकवला. गलावनमध्ये मार खाल्ल्यानंतर चर्चेतही चीनला माघार घ्यावी लागली. अनेक महिन्यांनी पँगाँग लेकवरील तंबू उखडून मागे जावं लागलं. चीनचे परराष्ट्रमंत्री 'भाई-भाई'चा राग आळवतायत आणि भारताशी युद्ध करायचं नाही, अशी भाषा करतायत. मात्र त्याच वेळी  भारतीय सीमेपर्यंत बुलेट ट्रेन आणण्याचा डावही खेळला जात आहे.

 

तिबेटमध्ये अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत बुलेट ट्रेन येणार आहे. तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत असलेला हाय स्पीड रेल्वेमार्ग सीमेपर्यंत येणार आहे. 435 किलोमीटरच्या मार्गाचं काम गेल्या वर्षीच पूर्ण झालंय.

त्यामुळे चीनच्या अंतर्गत भागातून अरूणचाल सीमेपर्यंत सैन्याची जलद वाहतूक करणं शक्य होणार आहे. अवघ्या 8 ते 10 तासांत मोठ्या प्रमाणात सीमेवर सैन्य जमवता यावं, अशी ही रणनीती आहे.

तिबेट हा चीनचा भाग असल्यामुळे तिथं काय करायचं, ही त्यांची अंतर्गत बाब आहे. मात्र चीनच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आपलीही यंत्रणा मजबूत करणंदेखील तेवढंच आवश्यक आहे.

सीमाभागामध्ये चीन पायाभूत सुविधांमध्ये सातत्यानं वाढ करतोय. एकीकडे मैत्रीची भाषा करायची आणि त्याच वेळी पाठीत खंजीर खुपसायचा, हे चीनचं धोरण कायम आहे. आपण ही कूटनीती ओळखून वेळीच सावध होणं आवश्यक आहे.