चिंताजनक ! मुलींमध्ये सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढलं, 13 ते 15 वयोगटातच व्यसनाधीन

National Health Mission)केलेल्या सर्व्हेत धक्कादायक आकडे समोर,  सिगरेट पिणाऱ्या मुलींच्या टक्केवारीत धक्कादायक वाढ

Updated: Nov 30, 2022, 07:13 PM IST
चिंताजनक ! मुलींमध्ये सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढलं, 13 ते 15 वयोगटातच व्यसनाधीन title=
प्रतिकात्मक फोटो

Smoking is Injurious to Health : धुम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याची सूचना वारंवार दिली जाते.  धुम्रपानाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. पण सध्याच्या तरुणांना धुम्रपान म्हणजे फॅशन वाटते. आपली कुल इमेज निर्माण करण्यासाठी अनेक तरुण धुम्रपान करतात.  धुम्रपानामुळे (Smoking) श्वसनाचे आजार होण्याची शक्यता तर असतेच कर्करोगाचाही धोका उद्भवू शकतो. सिगरेटच्या (Cigarette) प्रत्येक पाकिटावर 'स्मोकिंग इज इन्जुरस टू हेल्थ' असा इशाराही दिलेला असतो. पण याकडे दुर्लक्ष करुन तरुण वर्गात सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढत आहे. 

धक्कादायक अहवाल समोर
राष्ट्रीय आरोग्य मिशनने (National Health Mission) केलेल्या सर्व्हेत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. मध्यप्रदेशमध्ये तरुणींमध्ये सिगरेट आणि बीडी पिण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. एनएचएमने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 13 ते 15 वयोगटात सिगरेट पिणाऱ्या मुलींची टक्केवारी 9.3 टक्के एवढी आहे. तर बीडी पिणाऱ्या मुलींचं प्रमाण तब्बल 14 टक्के इतकं आहे.  या आकडेवारीनुसार देशाच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये मुलींचं सिगारेट आणि बिडी ओढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.

देशातील 987 शाळांमध्ये सर्व्हे
देशातील 987 शाळेतील 97,302 विद्यार्थिनी आणि मध्यप्रदेशमधल्या (Madhya Pradesh) 34 शाळेतील 2979 विद्यार्थिनींच्या ग्लोबल यूथ टोबॅको'ने केलेल्या सर्व्हेनुसार ही टक्केवारी जारी करण्यात आली आहे. या सर्व्हेत (Survey) देशातील 544 सरकारी आणि 433 खासगी शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात विशेषत: 13 ते 15 वयोगटातील मुलींचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. 

100 पैकी 11 मुली बिडी तर 7 मुली सिगरेट पितात
सर्व्हेनुसार मध्यप्रदेशमध्ये धुम्रपान करणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढत चाललं आहे. मध्यप्रदेशमध्ये 100 पैकी 7 मुली सिगरेट पितात. तर 13.1 मुलींना बिडी प्यायला आवडते. दारू किंवा अंमलीपदार्थ घेणाऱ्या मुलींचं प्रमाणही वाढत आहे. सर्व्हेतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशमध्ये मुली वयाच्या सातव्या वर्षापासूनच सिगरेट प्यायला शिकतात.

आरोग्य विभागाची चिंता वाढली
किशोरवयीन आणि तरुणांमध्ये व्यसनाचा वाढत जाणाऱ्या आकड्यांमुळे आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती अभियान सुरु करण्याचा विचार सुरु आहे. तरुणांमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे, अशाच तरुणांच्या कुटुंबियांवर मोठी जबाबदारी आहे. आपली मुलं काय करतात, त्यांना कोणत्या सवयी आहेत, याकडे लक्ष्य देण्याची गरज असून वाईट सवयींमुळे काय नुकसान होऊ शकतं हे सांगण्याचीही गरज आहे. 

हिंदी चित्रपट - मालिकांचा प्रभाव
हिंदी चित्रपट आणि मालिकांचा आजच्या तरुण पिढीवर प्रभाव पडतोय. विशेषत: वेब सीरिज पाहून मुलं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कूल दिसावं यासाठी प्रयत्न करत असतात. यातूनच ते व्यसनाच्या अधीन जातात. सर्व्हेनुसार दहावी आणि बारावीतील मुलं याकडे जास्त आकर्षित होतात.