मुख्यमंत्री रुपानींच्या मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजकोट पश्चिम या मतदारसंघात रॅली काढली आहे.

Updated: Dec 6, 2017, 02:14 PM IST
मुख्यमंत्री रुपानींच्या मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष title=

राजकोट : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजकोट पश्चिम या मतदारसंघात रॅली काढली आहे.

मतदारांशी साधला संवाद

ओपन जीपमधून मतदारांशी त्यांनी संवाद साधला. मात्र नंतर थेट खाली उतरून मतदारांशी हस्तांदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून रूपाणी राज्यभर प्रचारात व्यस्त होते. मात्र अखेरचे दोन दिवस त्यांनी आता आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

रुपानींच्या मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष

सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपानींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपानींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपानींना विजयाचं आव्हान दिलं आहे.

३ दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला

मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रुपानींची मुख्मंत्रीपदी वर्णी लागली. 2014 मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रूपाणी 27 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. मात्र यावेळी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र या निवडणुकीत सारी समीकरणं बदलली आहेत.

यंदा समीकरणं बदलली

या मतदारसंघात पाटीदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळं विजय मिळवण्यासाठी जातीय समीकरणं महत्वाची ठरू शकतात. या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. 75 हजार मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत तर 35 हजार मतदार क्षत्रिय आहेत. राजगुरू येत असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या 25 हजारांवर आहे. तर 35 हजार वाणी आहेत. रुपानी येत असलेल्या जैनांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे.